साहित्य लेखन प्रांतात ‘ काव्य ‘तथा ‘कविता ‘ हा लयबद्ध गेय असा रचनाप्रकार उदयास आला आहे. त्यातुनच गीतांची निर्मिती होते. कवितेचे मूळ रूप गीतामधून साकार झालेले आहे.
मुळात कविता ही लेखकाच्या कवी मनात,अंतःकरणात, ओतप्रोत भरलेली आहे. कविता ही गीत रूपाने साकार झालेली आहे.
कविवर्य माधव जाधव सर यांनी कविताही गीत रूपाने वाचकांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. म्हणूनच दोनशेच्यावर कविता गीत रूपात त्यांनी यु ट्यूब वर साकार केलेल्या आहेत.
कविता आणि गीत यांचा सुवर्णमध्य साधून, त्यांनी हा नवीन ‘ शब्दनाद ‘ काव्यगीत संग्रह वाचक रसिका समोर त्यांनी आणलेला आहे. त्यात सरांचा मी प्रथम असा संगीत-साहित्यिक मित्र आहे
ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव सरांच्या प्रत्येक साहित्याचा,कलेचा मी रसिक आहेच.त्यांनी साहित्य क्षेत्राच्या प्रत्येक शिखरे पदाक्रांत केलेली आहेत. त्यात त्यांनी नाट्यलेखन, एकांकिका लेखन,कविता लेखन, गीतलेखन, श्रुतिकालेखन आणि काव्य गीत लेखन मी खूप जवळून पाहिला आहे.अशा विविध अंगाढंगांनी, त्यांनी संगीत-साहित्य सेवा केलेली आहे.
म्हणूनच आज ‘ शब्दनाद ‘ काव्यगीत संग्रहावर समीक्षा तथा प्रस्तावना लिहिण्याचा मला,अतिशय दुर्मिळ असा योग आलेला आहे.
अल्पाक्षरत्व, सूचकत्व, या प्रधान वैशिष्ट्यांनी ते ओतप्रोत भरलेले आहे.
तसे पाहिले तर, ‘काव्यगीत’ हा सर्वार्थाने अन्य साहित्य प्रकारांपैकी अवघड, गुंतागुंतीचा असा साहित्य कलाप्रकार आहे. कवि श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मते तर” कवितेला धरू पाहणारे नव्यान्नव लोक स्वतः जळून जातात “याचे कारणही तसेच आहे. या रचना प्रकाराचे बांधकामच मोठे चिरेबंदी व भक्कम स्वरूपाचे आहे. तरीही अधिकांश साहित्यिकांना हा, “शब्दनाद “संमोहित करतो आहे. त्यांच्या काव्यगीत साहित्य लेखनाच्या प्रांताची सुरुवात काव्य लेखनानेच होते हेही वास्तव आहे.
आधुनिक डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या आधारे नाट्य लेखन, काव्यलेखन ते काव्यगायन,संगीतकार,दिग्दर्शन अशा रूपाने विविध रसाळ शब्दकळा,मराठी साहित्यात अजरामर करणारे नांदेड जिल्ह्यातील मौजे कुरळ्या तालुका कंधार येथील लोकप्रिय सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी माधव जाधव हे आहेत. त्यांची विविधांगी भावपाकळ्या, एक पाऊल पुढे, वन स्टेप अहेड (इंग्रजी भाषांतर), काळ्या बेटावरील माणसं, भारत माझा देश आहे तरी पण, शब्दशिल्प, उत्खनन अशी सात पुस्तके आजवर प्रकाशित असून” उत्खनन ” नंतरचे हे आता आठवे काव्यगीत संग्रह ” शब्दनाद ” च्या रूपाने मराठी साहित्य प्रांतात दमदारपणे प्रवेश करते आहे ! त्याचे स्वागतच करायला हवे.
कवितेतील ‘लावण्या ‘वरून पुढे सदाबहार’ लावणी काव्य, ओवीबद्धतेवरून ‘ओवी काव्य, शाहिरांच्या मुक्तकंठाने गौरविलेले ‘शाहिरी काव्य ‘पंडिती काव्य ‘असे अनेक पदर या कवितेतून पुढे आले आहेत. त्यात परत शाहिरी लावणी, बैठकीची लावणी (विशेष वर्गासाठी) इत्यादी साज शृंगारांनी कविता “माज घरातून” रंगतता वाढवीत वाढवीत ती बेमालुमपणे सार्वजनिक”लोकमंचावर ” धडकली आहेत.
लावणी, लोकगीत, भारुड, अभंग,प्रेम गीत, देशभक्ती गीत,भावगीत, भक्तीगीत ,ही आजही महाराष्ट्राची पारंपरिक कलासंस्कृतीच ही ओळख आहे. तमाशाच्या फडापासून ते चित्रपटापर्यंत आणि समारंभापासून ते ऑर्केस्ट्रापर्यंत ती सादर केली जाते. त्यात विशेषतः पारंपरिक शृंगारिक गाणे आणि डोळे दिपविणाऱ्या मनमोहक असे संयोजन आहे.
कविवर्य माधव जाधव यांनी ‘ प्रभापती’ या टोपण नावाने दोनशेच्यावर गीताचे लेखन केलेले आहेच. ते उत्कृष्ट असे संगीतकार म्हणून, खास अशी प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. प्रेमगीत, लोकगीत, देशभक्ती गीत,भावगीत, भक्तीगीत आणि लावणी गीतास त्यांनी दिलखुलासपणे संगीत दिलेले आहे.
पाश्चिमात्ये संगीतवाद्या बरोबरच त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्व वाद्यांचा,उपयोग केलेलाआहे.
ढोलकी,सारंगी,हार्मोनियम,झांज, हलगी,तबला,
तंबोरी, तुणतुणे या प्रमुख तालवाद्याद्वारे ती अधिकच धारदार बनविली आहे.जी नवीन पिढीसाठी आवश्यक अशी धरोवर त्यांनी निर्माण केली आहे.
‘लावण्या ‘शब्दच लावण्यवती, सौंदर्यवती तथा लावण्य किंवा सौंदर्य या मूळ शब्दापासून पुढे आला आहे. लावण्यवतींच्या अदाकारीचा चटका लावणाऱ्या ‘अदांकडे’ कला म्हणून पाहिले जाते.
स्त्रीविषयक पवित्र दृष्टिकोन शाबूत ठेऊनच या लोककलेकडे पाहिले जाते .स्त्री व पुरुष प्रेम यांना प्रेमविषयक काव्यगीतात महत्त्वाचे स्थान आहे. मराठी शाहिरी काव्यात या कलेच्या संवर्धनासाठी खास मंचावरील लावणी पण सरांनी लिहीली आहे.काव्यगीत लिहायला प्राधान्य देऊन, विशिष्ट बाज असलेली काव्य रचना कविवर्य माधव जाधव सरांनी ‘शब्दनाद’ या काव्यगीत संग्रहात केली आहे.
पुढे आधुनिक काळात स्त्री-पुरुष मानस प्रेमाची कल्पना आल्यावर, प्रेम कवितेचे वेगळे स्वरूप मराठी काव्यसृष्टीत त्यांनी साकार केलेले आहे.निसर्ग सौंदर्य,पती-पत्नी,प्रियकर-प्रे यसीच्या
विषयावर,तसेच देशभक्ती, पर्यावरण शक्ती, सामाजिक, आदर्शवत असे भक्ती गीते मराठीत विपुल प्रमाणात लेखन ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव सरांनी केलेले आहे.
” कलेसाठी जीवन की, जीवनासाठी कला ” या वादात न पडता सर्व सामान्य माणसासाठी ही कला असावी असे त्यांना वाटते. कला व कलाकृती जिवंत हृदयातले खरे शब्द घेऊन अवतरली असेल तर जनतेच्या हृदयातही तिचे स्थान अमरच राहते. म्हणूनच की काय साहित्य कलाकृती जाधव सरांना अत्यंत महत्त्वाची वाटते. याचा प्रत्येय ‘ शब्दनाद ‘ या काव्यगीत संग्रहामध्ये पाहायला मिळतोय.
आजच्या आधुनिक काळातील, हायटेक डिजिटल युगातील कांही पुरुष कलावंतांनाही लावणीने मोहिनी घातली. त्यांनी पायाला ठेका धरायला लावणारी ही लावणी कला आपलीशी करून घेतली. प्रसंगी कले साठी कलावतांना स्टेजवर थिरकण्यासाठी गीतकाराचे शब्द हेच समंमोहित करण्यास प्रथम कारणीभूत ठरत असतात आणि नंतर त्यांना सजवणारे गायक, संगीतकार, संगीत संयोजक,नृत्यांगणा,वाद्यवृंद आदी द्वितीयस्थानी मानले जातात. याचे कारण जसे शब्द तशा भावाभिव्यक्ती, एक्सप्रेशन्स आणि त्याला सादर करणारे कलावंत व तिथे त्याच आत्मियतेनेच दाद देणारे हौशी रसिकश्रोते या सर्व मिलाफातून एक आनंदाचे,मोहकतेचे आगळे वेगळे रसायन तयार होते. ‘प्रभापती’ माधव जाधव सरांनी अशी हे कार्य निर्माण केलेले दिसते.
अलीकडच्या काळात शृंगारिक लावणीवर मात करून सामाजिक, ऐतिहासिक,वैचारिक, देशभक्तीपर इत्यादी विषयावर ज्येष्ठ कवी माधव जाधव सरां सारख्या कवींनी ‘चावडी ‘वरून ती आता आत ‘आवडी ‘वर पोहोचवली दिसते आहे.कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी ही काव्यगीत लिहिली जाऊ शकते ! हा अनोखा प्रयोग सुप्रसिद्ध युट्युब गीतकार,हरहुन्नरी कलावंत, गायक,दिग्दर्शक,संगीतकार असेलेले ज्येष्ठ कवी माधव जाधव यांनी आपल्या ‘शब्दनाद’ काव्यगीताद्वारे सिद्ध करून दाखवले आहे.
“शब्दनाद ” या गीतकाव्यसंग्रहात विभिन्न विषयाला स्पर्श करणाऱ्या एकूण ४१ कविता आहेत. त्या गेयही असल्यामुळे त्यातील काही कविता दस्तुरखुद्द कवींनी गायलेल्या आहेत. तर इतर निवडक नामांकित महाराष्ट्रातील गायक गायिकांनीही मंचावर त्यांचे सुमधुर गायन केले आहे.
सर्वसाधारणपणे सहा भागात ‘शब्दनाद’या काव्यगीतांचा समावेश करता येईल. शेतकरी व पाऊस विषयक लावणी, शृंगारिक लावणी, महापुरुषांच्या वैचारिक कार्यावर चिंतनशील लावणी, देशभक्तीपर गीत, व्यसनमुक्ती विषयक विठ्ठलावरील अभंग भक्ती गीत अशा वैविध्य विभागातून ही काव्यगीते ‘शब्दनाद’ काव्येगीत संग्रहात पहावयास मिळतात.
“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ” द्वारे असे समजते की, देशात दरवर्षी हजारो शेतकरी हे दारिद्र्य, नैराश्य,नापिकी,कर् जबाजारीपणाला कंटाळून खाजगी जमीनदार आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात आलेल्या अक्षमते मुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायात अपयशच पदरात पाडून घेतलेले दिसेल. हे कठोर सत्य आहे.कधी वेळेवर पाऊस आला नाही,नंतर मग थोडं बहुत पीक आलं ते अतिवृष्टी अवकाळी पावसाने नेलं.कर्ज,दुष्काळी, अवकाळी या चक्राला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजेत ! असे कवीला वाटते. कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे.आज ना उद्या कष्ट फळाला येतील अशी अपेक्षा कवी कवितेतून व्यक्त करतात. ते म्हणतात,
घाम गाळून शेती करू धनी
कोरड्या दांडात फिरवा पाणी
केळी ऊसालाच पैका हाय धनी
भारी बेण्याची करा हो पेरणी
येईल की हातात पैका भरपूर
तुम्ही घाला की शेतात ट्रॅक्टर (पृष्ठ 28)
शेतकऱ्यांनी समयसूचकता ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. अधिक उत्पन्नाच्या पिकाची लागवड केली पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या हातात भरपूर पैसा येईलच ! असे कवीला वाटते. सरकारने पिकाला सुरक्षा आणि मालाला हमीभाव दिला पाहिजे. हा लढा चालूच राहणार आहे ! परंतु काही शेतकरी संघर्ष न स्वीकारता वारंवार सापत्नतेची वागणूक देणाऱ्या मायबाप सरकारवर रुसून बसतात. कष्टावर विश्वास ठेवून धरणीवर आपली स्वप्ने रंगविण्यापेक्षा,डोक्यात आत्महत्या हा विषय शिजवतात. कवी म्हणतात,शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. जीव संपविण्याचा तर अजिबात विचार करू नये. कारण परिस्थिती कायम राहत नाही. ती आपोआप बदलतेच.स्वतः शेतकरी असलेले कवी तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतात,
“धरणी माता आभाळ पिता
दोष कुणाला देऊ नको
उगीच निराश होऊन बापा
गळा तू फास लावू नको
माझ्या बापा (पृष्ठ 14
77)”
कवी प्रचंड आशावादी आहेत ते म्हणतात की,
“कष्टाचीच आपली वाट
साता जन्माची गाठ
धरणी माईच्या कुशी
हर्ष आनंदाची लाट (पृष्ठ 33)”
अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या माणसांचा जगण्यावरचा विश्वास शाबूत राहिला पाहिजे असे कवीला वाटते.
“कापणी खुडणी वेळेवर करू
घामाचे मोती पोत्याने भरू” (39)
असा विश्वास कविता व्यक्त करते. वारंवार दडी देऊन बसणाऱ्या, लपना छपणीचा खेळ खेळणाऱ्या पावसाला तथा वरूण राजाला ते विनवणी करताना म्हणतात की,
” रुसू नको फुगू नको
दडी मारून बसू नको
धरणीला शाप बापा
असा तू देऊ नको
बाप भाजला उन्हात
माय करपली रानात
. माधवा वर किरपा
होऊ दे रे (पृष्ठ 44)”
आम्ही स्वतःला काळ्या माई ची लेकरे, मातीला मानणारे,कष्टाचीच भाकर खाणारे, पिढ्यान पिढ्यांची शेती कसणारे जगाचे पोशिंदे आहोत ही शेती विषयक उदारतेची जाणीव कवितेत प्रचंड अभिमानाने उमटली आहे.शेतीविषयक परकोटीचा स्वाभिमान बाळगणारे कवी म्हणतात की,
“शेळ्या मेंढ्या आमचं धन
गाई वासरा आमुची शान
साऱ्या दुनियेत आम्हाला मान
नाही जगत गुलामीचे जीवन
(पृष्ठ-46)”
किंवा
” बळवान माहय धनी
त्याले कष्टाचे वरदान
उजाड या माळावरती
पिक घेतो गं जोमानं
मह्या धन्याच्या घामावर
दुनियेचा भरवसा
पोशिंदा ग मह्या धनी
नाही घेणार गळफास (पृष्ठ 50)”
शेतकऱ्यांच्या वाईट काळात हताश न होता जगण्याची उर्मी वाढवणारी ही कविता आहे.ही विचारधाराच शेती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचे अखंड गौरवगीत आहे. जगण्यावर प्रचंड श्रद्धा असलेले हे आशावादी श्रमगीत कवी माधव जाधव यांनी अफलातून मांडलेले आहे. ही रचना शेतकऱ्यांना मरणापासून वाचवणारी आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी जगला पाहिजे असे कवीला वाटते.आला पाऊस झिम्माड, येरे येरे पावसा,भिजलं रं भिजलं, दिल नभानं हे दान या कविता शेतकरी जीवनाची अस्मिता जोपासतात. कृषी प्रधान देशाच्या सांस्कृतिकतेचे हे निश्चितच अलंकार आहेत यात तीळमात्र शंका नाही.
कवीवर्य माधव जाधव उर्फ प्रभापती जाधव यांच्या ‘काव्यगीत’ संग्रहात विविध रंग आणि ढगांत आलेली आहेत. दोन हृदयाचा सर्वांगसुंदर अविष्कार आहे.उत्कट प्रेमाची अनुभूती मांडताना ते म्हणतात,
” चांदणे चुंबून गेले
मजला काल राती
नयन सागरी सख्या रे
आली बघ भरती (पृष्ठ 55) “
वयाची साठी ओलांडल्यानंतरही तारुण्याला लाजवेल अशा प्रणयपंचकी यौवन भावना कवीने अचूक शब्दात गुंतवलेल्या दिसतील.सुप्रसिद्ध गायिका शकुंतला जाधव यांनी गायलेले,
“‘तुझ्या प्रेमाच्या नावाचं टॅटू
काळजावर कोरलय ग
एका नजरेच्या तीरान
तुला माधवन हेरलाय ग
कुरकुर करतेस माझ्यावर मरतेस
विचार कर ग माझा (पृष्ठ 41)”
हा अनोखा युवा स्पंदनाचा एक्सरा वाचणारा कवी आजच्या डिजिटल तरुणालाही नक्कीच लाजवेल एवढी ताकद या कोळीगीतात आहे. शब्दात आहे.
किंवा
” ह्या चांदाची तू हाय चांदणी
लई डोलदार तुझी गं बांधणी
तू लाखानं हाय देखणी
मला पापलेट गावलाय सोनी
होडीत जाऊ फिरूनी येऊ
जरा मिठीत येऊन बैस नं
मी काळीज दिलय तुला ग
तू काळीज दे मला उसणं (पृष्ठ 39)”
ही कविता उद्याच्या नवतारुण्याने सळसळणाऱ्या पिढीच्या हृदयाच्या तारा छेडणाऱ्या आहेत. कवीची ‘लावणी’ नावाची कविता तर जणू सप्तसुरांच्या महामंचाला समर्पित करणारी आहे.
” नटले सजले इश्कात भिजले
गुलकंद फुलवाना ओठी
रंगवाना विडा रात रंगली मोठी (पृष्ठ 36)”
यासह प्रेम गीत,ढकला की ढकला की,कोळीगीत, कैरीची लावणी,दिवाना झालो तुझा या कविताही तरुणांच्या हृदयाची स्पंदने वाढवित तालासुरावर हळुवार ठेका धरणाऱ्या आहेत.
भारत ही महापुरुषांची खाण आहे. तेच खरेखुरे मातीचे सर्वश्रेष्ठ अलंकार आहेत. सर्व समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले तथागत शांतिदूत महात्मा गौतम बुद्ध,बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समता नायक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे व क्रांतीगुरु वीर उस्ताद लहुजी साळवे यांच्यावरील वैचारिक श्रद्धेलाही लावणीतून कवीने साकार करत ,त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेत जणू स्फूर्तीगीत गायले आहे. युद्धाला मातीत गाढून बुद्धाला जपावे तथा तमाम माणसांचा बुद्ध व्हावा या आशेवर कवीचा लेखन प्रवास चालू आहे. नको गृहत्याग करू आणि माणसांचा बुद्ध व्हावा या कविता गौतम बुद्धांच्या समतावादी सर्वस्पर्शी विचारांना समर्पित केलेल्या दिसतील.तर विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच अपेक्षित,बहिष्कृत भारताला खऱ्या अर्थाने सामाजिक स्वातंत्र्य मिळाले.केवळ त्यांच्यामुळेच पिढ्यानपिढ्याच्या गुलामीत अडकलेले कोटी कोटी श्वास मोकळे झाले. हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडले असे कवीला वाटते.’ दिल भिमानं हे दान’ ही कविता याचे अंतरंग उलगडते.
” काळ गुलामी चा होता
न्यायाचा नव्हता पता
काळोखाच्या गर्भामध्ये
सारा देश पिचला होता
भिमसुर्य जन्माला आला
लख्ख प्रकाश घेऊन (पृष्ठ 42)”
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरच खऱ्याखुऱ्या भारतीय लोकशाहीचा आधार असल्याची जाणीव कवी उदघृत करतो. त्याप्रमाणेच क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्याबद्दल वास्तव मांडताना ते म्हणतात की,
” इंग्रजांशी वंशज लढले
नवे इतिहास इथेच घडले
क्रांतिवीर तालमीत वाढले
शिक्षणाचे कोडे उलगडले (पृष्ठ48)”
अशी कार्याची नोंद घ्यायलाही ते विसरत नाहीत. ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांना राष्ट्रनिष्ठ बनवणारे लहुजी साळवे हे या काव्य गीताचा आत्मा आहेत.कवींना सत्यशोधक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचाही प्रचंड अभिमान आहे.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल ते कवितेत लिहितात,
” चातुर्वण्य जातिवाद
भीमानी केले सारे बरबाद
गुलामगिरी नष्ट करण्या
मानवाला घातली साद
मानपान स्वाभिमान
पुस्तकात पेरलय ग (पृष्ठ 89)”
ही रचना खऱ्या अर्थाने जगद्विख्यात साहित्यिक अण्णाभाऊंच्या कार्याचा इतिहास दर्शवते.
‘ प्रखर देशभक्ती’ वरही कवीने देशभक्ती गीत लिहून राष्ट्राप्रती आपल्या अभंगनिष्ठेची पावती दिली आहे. या देशाचा आधारस्तंभ हा देखील तरुण असल्यामुळे तो निर्व्यसनी, निरोगी निघावा. तो कर्तव्यदक्ष असावा.यासाठी ‘व्यसनमुक्ती ‘या कवितेतून देशातील तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे.तर अभंग विठ्ठलाचा’ मधून कवीची जी संस्कारशील ईश्वरनिष्ठा आहे तितकीच ती श्रद्धेसह वाचकांसमोर आली आहे. महाराष्ट्राचे आध्यात्मिक आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणावर भावफुले ठेवताना ते म्हणतात,
” माझा देह तुझ्या चरणी
सदा वाहू रे विठ्ठला
नाम तुझे माझ्या हृदयी
सदा राहू दे विठ्ठला (पृष्ठ 25)”
अशी व्यक्तिगत जीवनातील कवीची ईश्वर विषयक निष्ठा “अभंग निष्ठा” होऊन लावणीपर गीताचा विषय झालेली दिसेल.
एकंदरीत सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी गीतकार माधव जाधव यांच्या “शब्दनाद” काव्यसंग्रहातील सर्व रचना वाचकांच्या काळजाचा ठाव घेतात. हौशी रसिकांच्याश ओठावर सदैव गुंजन करत मनावरश अधिराज्य करतात. नव्हे तर मनामनांवर शब्दसुरांचे मनोहारी चांदणे शिंपडणारा काव्यसंग्रह म्हणजे “शब्दनाद”होय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यातील सर्व रचना नुसत्या गेयच आहेत असे नाही तर महाराष्ट्रातील नामवंत विविध गायक गायिका यांनी त्यांना आवाज दिला आहे त्यामुळे आघाडीचे गीतकार म्हणून महाराष्ट्रात माधव जाधव यांची नक्कीच वर्णी लागलेली दिसेल.वाचकांना हा गीत काव्यसंग्रह नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
-प्रा. डॉ.ज्ञानेश्वर निवृत्तीराव हंडरगुळीकर
ता.उदगीर जि.लातूर
( सदस्य,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती, पुणे )
भ्रमणध्वनी क्रमांक- 9158792198
