नांदेड- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार माधव जाधव लिखित छत्रपती संभाजीनगर येथील चिन्मय प्रकाशनाने सिद्ध केलेल्या ‘शब्दनाद’ या गीतसंग्रहाचे आणि युवाकवी धम्मोदय वाघमारे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या साहित्यसेवा प्रकाशनाने सिद्ध केलेल्या ‘प्रेमगंध’ या चारोळीसंग्रहाचे आज रविवारला दि.२१ रोजी शहरातील शिवाजीनगरस्थित हाॅटेल विसावा पॅलेस येथे सकाळी ११ वाजता दोन्ही पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे हे राहणार असून ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, लेखक माधव जाधव, उपप्राचार्य प्रा. प्रल्हाद हिंगोले, कवयित्री रुपाली वागरे वैद्य, सावित्री शेवाळकर, बाबुराव पाईकराव, अनिता जाधव, गझलकार चंद्रकांत कदम यांची उपस्थिती राहणार आहे.

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने सप्तरंगी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, कथाकथन, गझल मुशायरा व खुल्या कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सत्कार समारंभात ज्योती करवंदे परांजपे, नम्रता खिल्लारे, सृष्टी पाईकराव, डी. एन. मोरे खैरकेकर, भाग्यश्री आसोरे, प्रतिभा पांडे, अंजली हिंगोले, ज्योती लाभसेटवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर बालाजी थोटवे यांचे कथाकथन, सुप्रसिद्ध गझलकार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांचा गझल मुशायरा तर कवयित्री ज्योती करवंदे परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली पन्नास कवी कवयित्रींचा काव्यपौर्णिमा- १०२ या खुल्या कविसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील कवी कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयोजन समितीने केले आहे.
