नवीन नांदेड : जून महिन्यात पद्मजा सिटी परिसरात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय कुमार बंसल यांच्या घरात झालेल्या लाखोंच्या चोरीप्रकरणी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने काही आरोपी पकडून मोठी पत्रकार परिषद घेत श्रेयही उचलले. मात्र या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला असता तक्रार, जप्ती आणि पोलिसी कागदपत्रांतील आकडे इतके विसंगत आहेत की “दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे” असा प्रकार असल्याचे चित्र समोर येत आहे.
डॉ. धनंजय बंसल हे नामांकित हृदयरोगतज्ज्ञ असून त्यांच्या पत्नी शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोघेही गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार घडला. डॉ. बंसल २३ जुलै रोजी नांदेडला परतल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १० ते १४ जुलै २०२५ या कालावधीत घरात चोरी झाली होती.
त्यानंतर १४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या पुरवणी जबाबात तब्बल ३५ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले. यात सुमारे ३० लाख रुपये रोख, सोन्याचे बिस्किट, दागिने, हिऱ्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने असा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एकूण २४ तोळे सोने, १६.४६ ग्रॅम अतिरिक्त सोने व २१ तोळे चांदी असा ऐवज नमूद आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७२/२०२५ दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला नांदेड ग्रामीण पोलिसांकडे होता. मात्र समांतर तपासाच्या अधिकाराचा वापर करत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. त्यांनी शेख आमिर शेख पाशा, शेख शफी उर्फ बिल्डर आणि नंदकिशोर वामन देवसरकर या तीन आरोपींना अटक केल्याचे जाहीर केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी झाली.
दरम्यान, या प्रकरणात निजामाबाद (तेलंगणा) येथील मिर्झा मुजाहिद बेग मिर्झा नजीर यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्रमांक ७७९/२०२५ दाखल केला. सुनावणीदरम्यान अर्जदारांचे वकील ॲड. टी. एस. पठाण यांनी सांगितले की अर्जदार सोन्या-चांदीचा व्यवसाय करतात आणि ५ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना नोटीस देऊन तपासासाठी हजर राहण्यास सांगितले होते.
मात्र गंमत इथेच आहे. पोलिसांच्या अहवालानुसार या गुन्ह्याची सुरुवातीची तक्रार केवळ १ लाख ७५ हजार रुपयांची होती. डॉ. बंसल परत आल्यानंतर चोरीच्या ऐवजात मोठ्या प्रमाणावर वाढ दाखवण्यात आली आणि थेट आकडा ३५ लाख ३१ हजारांवर गेला.
याहून गंभीर बाब म्हणजे तक्रारीतील ऐवज आणि जप्त केलेल्या ऐवजाच्या किमतीत मोठे तफावत आढळतात. उदाहरणार्थ,
- तक्रारीत १० तोळे सोन्याचे बिस्किट – २ लाख रुपये दाखवले असताना
- जप्तीत त्याच बिस्किटाची किंमत ११ लाख रुपये दाखवण्यात आली आहे.
तसेच जप्तीत ७ लाख रुपयांची ब्रिझा कार दाखवण्यात आली आहे, जी मूळ तक्रारीत नमूदच नव्हती. रोख रक्कम, सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्र, चांदीचे नाणे, आमटी आदींच्या किमतीही तक्रार आणि जप्ती अहवालात वेगवेगळ्या दाखवण्यात आल्या आहेत.तक्रारीतील हिरे जडित वस्तू बाबत जप्ती अभलेखात काही नमूद नाही,
हे सर्व आकडे आम्ही सांगत नाही, तर पोलिसांनी तयार केलेल्या अधिकृत अभिलेखांत तसेच दोषारोपपत्र आणि अटकपूर्व जामीन अर्जातील कागदपत्रांत स्पष्टपणे नमूद आहेत. काही कागदपत्रे दोषारोपपत्रात आहेत, तर काही जामीन अर्ज क्रमांक ७७९/२०२५ सोबत जोडलेली आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने सोनाराला दिलेली नोटीस आणि आरोपींच्या अटकेची तारीख यांचा अभ्यास करूनच नांदेडचे अतिरिक्त्त सत्र न्यायाधीश एस, डी. तावशीकर यांनी तेलंगणा राज्यातील सोनार मिर्झा मुजाहिद बेगला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. न्यायाधीश तावशीकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक ७७९/२०२५ च्या आदेशाची प्रत पोलीस अधीक्षक नांदेड यांना पाठवून त्यांना गरज वाटत असेल तर कार्यवाही करण्यासाठी उल्लेखित केले आहे, पण या प्रकरणातील चोरट्यांना पकडले होते तेव्हा तर नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्या एलसीबी अधिकाऱ्यांची लांबलचक प्रशंसा केलेली आहे,या प्रकरणाला विलक्षण अश्या शब्दात न्यायालयाने उल्लेखित केले आहे.
मग प्रश्न असा उभा राहतो की,
तपास कसा केला जातो? कोणाच्या मार्गदर्शनात केले?काय दाखवले जाते आणि काय लपवले जाते?कोण करायला लावते?दाखवलेल्या आकड्यांआडचे सत्य वेगळे तर नाही ना?
हा प्रश्न आम्ही वाचकांच्या विवेकावर सोडत आहोत.
