अखेर तब्बल दीड वर्षांचा “गंभीर विचारमंथनाचा” काळ संपून भारतीय जनता पार्टीला कार्यकारी अध्यक्ष सापडला आहे. इतका मोठा पक्ष, इतकी मोठी सत्ता आणि अध्यक्ष शोधायला दीड वर्ष! शेवटी बिहारमधील मंत्री नितीन नबीन यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या परंपरेनुसार कार्यकारी अध्यक्ष पुढे राष्ट्रीय अध्यक्ष होतो, त्यामुळे नितीन नवीन यांच्याही नशिबात तेच लिहिलेले असावे,अर्थात मोदी–शहा यांना मान्य असेपर्यंत.
काल-परवाच संघप्रमुख मोहनजी भागवत यांच्यासोबत अमित शहा अंदमानमध्ये कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे अनेकांना वाटले, “आता संघाचा माणूस अध्यक्ष होणार.” पण भाजपने ती चूक होऊ दिली नाही. नितीन नवीन यांची निवड करून भाजप पुन्हा एकदा ठामपणे सांगत आहे,पार्टी संघाची नाही, पार्टी मोदी–शहांची आहे!कालपर्यंत ज्यांचे नाव कुणाला माहीत नव्हते, ज्यांची ओळख करून घ्यायची असेल तर थेट गुगल देवाची मदत घ्यावी लागत होती, अशा व्यक्तीला थेट राष्ट्रीय नेतृत्वाच्या रांगेत बसवण्यात आले आहे. पण यात नवीन काहीच नाही. याआधीही पहिल्यांदाच आमदार झालेले, प्रशासनाचा “अनुभव म्हणजे फाइल पाहिल्याचा” अनुभव असलेले अनेक मुख्यमंत्री देशाने पाहिले आहेत. कारण एकच तो नेता कधीच “कानापेक्षा मोठा” होऊ नये.मोदी–शहांच्या कानापेक्षा मोठा नेता त्यांना सहन होत नाही, हे आता गुपित राहिलेले नाही. म्हणूनच निवड अशी असते की नेता कायम आज्ञाधारक, शांत आणि गरज पडल्यास पूर्णपणे अदृश्य!आता प्रसारमाध्यमे पुढील काही दिवस नितीन नबीन किती दूरदृष्टीचे आहेत, किती अभ्यासू आहेत, किती दमदार आहेत, याचे पोवाडे गायला सुरुवात करतील. शब्दांची आतषबाजी होईल. पण शब्दांचा खेळ कोणाला जमत नाही, असा देश उरलेला नाही.
या निवडीमुळे महाराष्ट्रातून राष्ट्रीय अध्यक्ष जाणार, ही मागील दीड वर्षांपासून चाललेली चर्चा आता आपोआपच संपली आहे. प्रश्न इतकाच आहे. जर “नवीन” नावाचाच माणूस हवा होता, तर भाजपला तो शोधायला दीड वर्ष का लागले? गुगल स्लो होतं की काय?एकदा अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते, “आमचा पक्ष मोठा आहे, म्हणून अध्यक्ष निवडायला वेळ लागतो.” पण इतका मोठा की अध्यक्ष निवडायलाच दीड वर्ष? हा प्रश्न आता लोक विचारायला लागले आहेत.
नितीन नबीन चार वेळा आमदार राहिले आहेत, सध्या पाचवी टर्म सुरू आहे. वय फक्त ४५ वर्षे युवक चेहरा म्हणून वापरायला अगदी परफेक्ट. वडील नवीन सिन्हा आमदार होतेच. म्हणजे घराणेशाहीचा अनुभव घरातूनच मिळालेला. पण चालतं, कारण भाजपची घराणेशाही ही “राष्ट्रहितासाठीची” असते! नितीन नवीन यांचे वडील आमदार होते म्हणजे घराणेशाही पूर्ण. पण भाजप यातून असा प्रचार करेल की काँग्रेसमध्ये अध्यक्षांची मालिका आहे आणि आम्ही युवकांना संधी देतो. युवक कोण? अर्थात आज्ञाधारक युवक! भाजप कायम घराणेशाहीवर टीका करतो, पण स्वतःच्या घरातली घराणेशाही ही त्यांना कधीच दिसत नाही. कारण आरशात पाहण्याची सवय नसावी.
खरे तर २०२० च्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच अध्यक्ष निवडायला हवा होता. पण तेव्हा खासदारांची संख्या कमी झाली, आणि “मोदी–शहांचा प्रभाव कमी होतोय” अशी कुजबुज सुरू झाली. म्हणून अध्यक्षाचा विषय फाइलमध्येच पडून राहिला.नंतर हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार जिंकल्यावर आता सांगितले जात आहे,“आमचा प्रभाव अजूनही कायम आहे.” निवडणुकीवरील आक्षेप वेगळे, पण सत्तेचे फोटो मात्र जोरात दाखवायचे!
लोकसभा निवडणुकीदरम्यान जे. पी. नड्डा यांनी अभिमानाने सांगितले होते की, “आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी आरएसएसची गरज नाही.” त्यानंतर आकडे कमी झाले आणि आवाजही कमी झाला. तेव्हा वाटले होते की आता संघाच्या मर्जीचा अध्यक्ष येईल. पण भाजपने ती शक्यता कायमची संपवली आहे.इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कधीच “मी निर्णय घेतला” असे म्हणत नाहीत. कारण निर्णय घ्यायचे अधिकार अध्यक्षांकडे नसतात. ते अधिकार फक्त दोनच जणांकडे असतात,नरेंद्र मोदी आणि अमित शहा.नितीन नबीनही वेगळे असणार नाहीत. मोदी–शहा जे सांगतील, तेच निर्णय, तेच आदेश, तेच काम. अध्यक्षपद म्हणजे फक्त नाव, बाकी सगळं वरून ठरलेलं.
एकूण काय, “संघाच्या मर्जीचा माणूस भाजपचा अध्यक्ष होईल” या कल्पनेवर आता अधिकृतपणे पाणी फेरले गेले आहे. पुढे अजून काय काय नाकारले जाईल, हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ द्यायचा आहे,कारण भाजपमध्ये काहीही अशक्य नाही!
