सन 2001 मध्ये भारतीय संसदेवर पाच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस जवान, दोन संसद सुरक्षा रक्षक आणि एक माळी असे एकूण नऊ निष्पाप लोक शहीद झाले. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व पाच अतिरेक्यांचा खात्मा करून देशाची मान उंचावली.
दरवर्षी 13 डिसेंबर रोजी या शहिदांना अभिवादन करण्यात येते. याच अभिवादन समारंभात एक छोटा, पण अर्थपूर्ण फरक यंदा देशाने पाहिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करताना बूट घालूनच उपस्थित होते, तर विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मात्र आपल्या पायातील बूट बाजूला ठेवून, नतमस्तक होऊन शहिदांना श्रद्धासुमन अर्पण केले.
ही बाब क्षुल्लक वाटू शकते, पण यातून संस्कारांची खोली कळते. राहुल गांधींना “पप्पू” म्हणून हिणवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची शासकीय यंत्रणा खर्ची घालण्यात आली; पण त्या दिवशी ते “पप्पू” नसून, संवेदनशील आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले.
ज्यांच्या वडिलांची आणि आजींची हत्या दहशतवादामुळे झाली, त्या व्यक्तीला शहिदांचे दुःख अधिक तीव्रतेने कळणे स्वाभाविकच. आपले माणसे गेल्यावरच त्यांच्या वेदनेची खरी जाणीव होते. हा मानवी स्वभाव आहे. म्हणूनच राहुल गांधींनी पायातील पायताण काढून शहिदांना अभिवादन केले.
“आम्ही विश्वगुरू आहोत” असे वारंवार सांगितल्याने विश्वगुरूत्व सिद्ध होत नाही; ते कृतीतून दिसावे लागते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीस्थळी गेले, तेव्हा त्यांनीही आपले पायताण बाहेर काढले होते. तो आदर बोलका नव्हता, कृतीतून व्यक्त झालेला होता.
याच धर्तीवर 13 डिसेंबर रोजी शहिदांना अभिवादन करताना राहुल गांधींच्या कृतीत तोच आदर दिसून आला. ते परदेशात जातात म्हणून त्यांच्यावर आरोप केले जातात कधी ऐय्याशीचे, कधी निष्क्रियतेचे. पण वास्तव असे की ते नामवंत विद्यापीठांत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, थिंक टँक्ससोबत चर्चा करतात आणि ज्ञानसंपादन करतात. हा देखील एक नोंद घेण्याजोगा अभिलेखच आहे.चुकीचे आरोप करणाऱ्यांचे फोटो सुद्धा आता पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे राहुल गांधींना पाहून इतर काँग्रेस नेत्यांनीही आपले पायताण बाजूला काढले. कारण नेतृत्व हे केवळ भाषणातून नव्हे, तर उदाहरणातून घडते. नेते काय करतात याकडेच कार्यकर्ते आणि समाज पाहत असतो, आणि त्याच कृती आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणूनच कोणतीही गोष्ट करताना “मोठेपणा” दाखवण्याऐवजी “मोठा विचार” करणे आवश्यक असते. संस्कार सांगावे लागत नाहीत,ते आपोआप दिसतात. एवढेच वाचकांसमोर नम्रपणे मांडावेसे वाटले.
