पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात, याचे थेट आणि स्पष्ट उत्तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. मोदींना उद्देशून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “तुमच्या संपूर्ण चरित्राचा अभिलेख माझ्याकडे आहे.” अशी भीती मोदींना दाखवली जात आहे.
१४ डिसेंबर रोजी उल्हासनगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, मोदींच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असून ती केवळ न्यायालयात सादर करायची बाकी आहेत. तसे झाले, तर न्यायालय तुम्हाला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच खोट्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवा, नाहीतर गप्प बसा, असा थेट इशारा त्यांनी दिला.
कोविड काळातील अमानुष वास्तव आठवताना आंबेडकरांनी सरकारवर घणाघाती टीका केली. बिहारमध्ये मतदानासाठी देशभरातून आलेल्या मजुरांना पायी चालत शेकडो किलोमीटर प्रवास करावा लागला. रेल्वे बंद, बसेस बंद, पायांना भेगा पडलेल्या अवस्थेत लोक चालत होते. त्या वेळी लोक म्हणत होते, “ज्या सरकारने आम्हाला पाहिले नाही, त्या सरकारला आता आम्ही पाहणार नाही.”
तरीही इतर राजकीय पक्ष पराभूत झाले आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत राहिली. निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय विरोध संपवण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा धोकादायक खेळ सुरू आहे.
एकीकडे आम्हाला ‘विश्वगुरू’ असल्याची गोड गोष्ट सांगितली जाते, पण वास्तव मात्र विदारक आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येऊन गेले. त्यांनी काय आश्वासन दिले? कोणते करार झाले? याबाबत ना पुतीन काही बोलतात, ना नरेंद्र मोदी. मोदींच्या कालखंडात ‘विश्वगुरू’ होण्याच्या नशेत भारताचा जगातील एकही ठोस मित्र उरलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतासोबत उभा राहणारा एकही देश नव्हता, हे कटू सत्य आहे.
पुढील दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशाराही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला. इंग्लंड, अमेरिका पाकिस्तानला मदत करत आहेत, तर रशिया आणि चीनही त्याला शस्त्रसज्ज करण्यास तयार आहेत. म्हणजेच भारताला केवळ पाकिस्तानशी नव्हे, तर चार शक्तींशी सामना करावा लागू शकतो. हे देश भारत सरकारच्या विरोधात आहेत, भारतीय जनतेच्या नाहीत. हा सत्तेचा अहंकार आहे, ‘विश्वगुरू’चे नाटक आहे, आणि त्याची किंमत सामान्य भारतीय नागरिकांना मोजावी लागत आहे.
सनातनी विचारधारेवर प्रश्न उपस्थित करताना आंबेडकर म्हणाले की, “तुम्ही इथल्या मुस्लिम समाजाला माजला म्हणता. पण जग पाकिस्तानमधील मुस्लिमांना माजवत आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार?” आज जग पाकिस्तानच्या माध्यमातून भारताचा काटा काढण्याच्या तयारीत आहे, हे दुर्लक्ष करता येणार नाही.
नरेंद्र मोदींची भाषा बिहार निवडणूक जिंकल्या नंतर बदलली आहे. “मी जे काही करतो, त्याला जनतेचा पाठिंबा आहे,” असे ते ठामपणे सांगतात. पण लोकसंख्येचे वास्तव वेगळे आहे. जगातील अनेक देशांची लोकसंख्या घटत असताना भारताची प्रचंड लोकसंख्या हीच बाजारपेठ आहे. लोकसंख्या म्हणजे बाजार. जास्त लोक म्हणजे मोठी बाजारपेठ.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले विधान धक्कादायक आहे,भारतामधील ४७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. रशियाकडून स्वस्त तेल घेतल्यामुळे वर्षाला ४० ते ४५ हजार कोटी रुपयांचा फायदा होत असल्याचे सांगितले जाते. पण हा नफा जातोय कुठे? भारताच्या तिजोरीत की रिलायन्सच्या तिजोरीत? हाच कळीचा प्रश्न आहे. रिलायन्सला जाणारा नफा रोखण्यासाठीच ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लावल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
जर हा नफा भारताच्या तिजोरीत जमा झाला असता, तर त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाच झाला असता. मोदी म्हणतात, “जनता माझ्यासोबत आहे.”
पण पाकिस्तानसोबत युद्ध हवे की नको, हे ठरवण्याचा अधिकार जनतेकडे आहे. युद्ध थांबवायचे असेल, तर मताच्या अधिकारातूनच ते शक्य आहे.आता वेळ आली आहे की, मतांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगायचे आहे की,
आम्ही मोदींसोबत नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत नाही.
