राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहास प्रारंभ; जवळ्यात चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन
नांदेड- दैनंदिन जीवनात मर्यादित उर्जा वापरून आणि आपल्या भावी पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी पारंपारिक स्त्रोतांचे शोषण थांबवून अपारंपारिक ऊर्जाचा वापर वाढूविला पाहिजे. सूर्य हा उर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन मानवाने उर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन होय, असे विज्ञान शिक्षक उमाकांत बेंबडे यांनी व्यक्त केले. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या कल्पकतेतून ‘उर्जेची बचत आणि संवर्धन’ हे विषय देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विषय शिक्षिका संगीता बडवणे, माजी सरपंच साहेबराव शिखरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, साहेबराव गोडबोले, आनंदा गोडबोले, रवी गोडबोले, मनिषा गच्चे, हैदर शेख, संतोष घटकार, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ, पांडुरंग गच्चे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन १४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक ढवळे म्हणाले की, ऊर्जा संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्व विविध घटकांना पटवून देणे हा या उपक्रमाचा भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर केला पाहिजे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी बालवयातच जनजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार यांनी विद्यार्थ्यांना उर्जा बचत व संवर्धनाची शपथ दिली. या निमित्ताने ऊर्जा संवर्धन सप्ताह म्हणून २० डिसेंबर पर्यंत साजरा करण्याचा मानस असून यात जनजागृती, शालेय स्तरावर चित्रकलेसह निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी सांगितले.
या सूचनांचे पालन करावे
उर्जा संवर्धनाकरिता दैनंदिन जीवनात काय करणे शक्य आहे, याबाबत काही सूचना यावेळी देण्यात आल्या. गरज नसेल तेंव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे, वापरात नसेल तेंव्हा विद्युत उपकरणांचे मेन स्वीच बंद ठेवणे, कार्यालयात व घरात सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे, घरातील आतील भिंतींना व छताला फिक्कट रंग देणे, फ्रिजमध्ये जास्त बर्फ साचणार नाही याची दक्षता घेणे, विजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी सात ते ११ व सायंकाळी सहा ते १० या वेळेत मोठ्या प्रमाणावर वीज उपकरणांचा वापर टाळावा, आदी दैनंदिन जीवनातील ऊर्जा बचतीच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.
