काँग्रेस महारॅलीत जनसागर उमळला
१४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक या सभेसाठी दाखल झाले. इतकी प्रचंड गर्दी होती की दिल्लीची वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली. लोकांना निवासाची जागा मिळाली नाही; अनेकांना रस्त्यांवर, बागांमध्ये, उघड्यावर रात्र काढावी लागली. कडाक्याची थंडी आणि धुक्याची पर्वा न करता सकाळी सहा वाजल्यापासून नागरिक रामलीला मैदानात प्रवेशासाठी रांगेत उभे होते.
या सभेतील महिलांचा सहभाग इतका मोठा होता की त्यावर भाष्य करण्यासाठी शब्द अपुरे पडावेत. एका महिलेने तर साखळदंडांनी स्वतःला बांधून “वोट चोर कधी छोड” अशा घोषणा देत व्यवस्थेविरोधात आपला संताप व्यक्त केला. देशभरातून गोळा केलेल्या कोट्यवधी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र व्यासपीठासमोर मांडण्यात आले आणि “वोट चोर कधी छोड” या घोषणेला उपस्थितांनी एकमुखी संमती दिली.या सभेत बोलताना खासदार प्रियंका गांधी यांनी भारतीय लोकशाहीचा गाभा स्पष्ट शब्दांत मांडला. त्या म्हणाल्या की, एक काळ असा होता की पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक ठिकाणी गेले की जनता “भारत माता की जय”च्या घोषणा देत असे. मात्र नेहरूंनी भारत मातेचा अर्थ केवळ घोषणांपुरता मर्यादित ठेवला नाही. भारताची निसर्गसंपदा, पर्वत, नद्या, आणि भारतात जन्मलेला प्रत्येक युवक व युवती हे सर्व मिळून भारत माता आहे, असे त्यांनी सांगितले. याच विचारातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आणि त्याच संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला.

त्या पुढे म्हणाल्या की, संविधानाच्या मार्गदर्शनाखाली न्यायपालिका, प्रसारमाध्यमे, निवडणूक आयोग, सत्ता पक्ष, विरोधी पक्ष अशा संस्था उभ्या राहिल्या—लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी. मात्र आज या सर्व संवैधानिक संस्थांना खिशात घालण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा हल्ला संस्थांवर नाही, तर भारताच्या प्रत्येक पुत्रावर आणि पुत्रीवर आहे. हे देशातील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. आज न्यायपालिका दबावाखाली आहे. प्रसारमाध्यमे गुलाम बनवली गेली आहेत, कारण त्यांचे मालक अडाणी किंवा अंबानी आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत अनेक मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या खात्यांत हजारो कोटी रुपये असताना, विरोधकांना आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचा कट उघडपणे राबवला गेला.
प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले की, सत्ताधाऱ्यांनी खरी निवडणूक लढवून दाखवावी मतपत्रिकेवर, मुद्द्यांवर. त्यांना माहीत आहे की ते तसे केल्यास कधीच जिंकू शकणार नाहीत. बिहारसह अनेक ठिकाणी मतदानाचा अधिकार पद्धतशीरपणे हिरावून घेतला गेला. निवडणूक आयोगाने लाखो मतदारांची नावे यादीतून काढून टाकली. गणेश कुमार, सुखविंदर सिंग संधू आणि विवेक जोशी या तीन निवडणूक आयुक्तांची नावे देश विसरणार नाही. एका दिवशी त्यांना भारतीय जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल.आर्थिक आघाडीवर सरकार अपयशी ठरले आहे. डॉलरचा दर वाढला, निर्यात घटली, आयात महागली आणि परराष्ट्र धोरण रसातळाला गेले. देशाची संपत्ती मोजक्या मित्र उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. तरुण बेरोजगार आहेत, पेपर लीक होत आहेत, महागाई वाढत आहे, बेटिंग अॅप्समुळे युवक उद्ध्वस्त होत आहेत आणि तरीही सरकार गप्प आहे.
या प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, सत्य नव्हे तर शक्ती महत्त्वाची आहे, असा संदेश आरएसएस देत आहे. मात्र हिंदू धर्माची आणि भारताची खरी परंपरा सत्याची आहे. आम्ही सत्याच्या जोरावर नरेंद्र मोदी आणि आरएसएसची सत्ता समाप्त करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले की, मतदान चोरी म्हणजे संविधानावर थेट हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “एक व्यक्ती, एक मत” या तत्त्वाची पायमल्ली होत आहे. नोटबंदी, चुकीची जीएसटी, बेरोजगारी, प्रदूषण या सर्वांचा हिशेब देशाची जनता घेईल. सत्ता असताना हे ताकदवान वाटतात, पण सत्ता गेल्यावर यांची खरी अवस्था देश पाहील.शेवटी राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसची विचारधारा ही आयुष्याची आणि सत्याची आहे. आम्ही घाबरणार नाही, थांबणार नाही. या देशात शेवटी सत्याचाच विजय होईल—हे अटळ आहे.
