जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
नांदेड- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी ध्वजदिन निधीस आपले जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाडे यांनी केले.
जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, विविध माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, लक्ष्मण देवदे, दत्ता पोतगन्ते, प्रकाश कस्तुरे, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर डूमणे, नागनाथ बासरे, कमलाकर शेटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली.
वर्ष 2024-25 साठी शासनाने जिल्हयाला 50 लाख 50 हजार रू.एवढे उद्दिष्ट दिले होते. यात नांदेड जिल्हयाने 30 लाख 40 हजार रू. जमा करुन 60.19 टक्के पुर्ण केले आहे. वर्ष 2025-26 साठी शासनाकडुन 50 लाख 50 हजार एवढे उद्दिष्ट मिळाले असुन हे उद्दिष्ट निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यात येईल असे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले.
दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पुर्ण केल्याबद्दल शासनाने नांदेड जिल्हयाचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे. या संकलनात जिल्हयातील ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालये तथा महाविदयालय यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचा सत्कार अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हयातील वीरनारी, वीरमाता-पिता यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष गौरव पुरस्कारांचे १ लाख ४० हजार रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत सुभेदार अर्जुन जाधव यांनी केले आणि कॅप्टन बळीराम गिराम, कल्याण संघटक यांनी आभार मानले.
