विनोद पावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती : वाढदिवसावरील खर्च पूरग्रस्तांना आणि मराठा आंदोलकांसाठी देणार

नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद नीलकंठराव पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आयोजित करण्यात आलेला गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून वाढदिवसावर होणारा खर्च टाळून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करणे आणि मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या बांधवांसाठी भोजन व्यवस्थेवर खर्च करण्यात येईल अशी माहिती विनोद पावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष दिपक स्वामी , रवी राठोड मनसे जिल्हाध्यक्ष ,वहातुक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, आकाश गेंटेवार , विशाल पावडे , आमर कोडराज, धम्मपाल आढाव ,योगेश्वर मोरे , गोविंद पाटील मोरे ,शक्ती परमार आदी उपस्थित होते.
आयोजित पत्रकार परिषदेत मध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करताना विनोद पावडे म्हणाले की , यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझ्या मित्रांनी लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. शेकडो पशूंची हानी झाली आहे. अशा परिस्थितीत मी गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम रद्द केला आहे. आपला समाज बांधव संकटात सोडून अशी कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम उचित नसल्याने सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देऊन केवळ साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी सात वाजता मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिरात महाभिषेक करण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी वारकरी संप्रदाय साधक यांना भेटवस्तू आणि अल्पोपार देण्यात येईल. सकाळी नऊ वाजता नांदेड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून अभिवादन करण्यात येणार आहे . सकाळी अकरा वाजता खडकुत येथील गो शाळेतील पशुंसाठी एक ट्रक चारा भेट देण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा येथे माथा ठेकून आशीर्वाद घेण्यात येणार आहे . दुपारी दोन वाजता धनेगाव येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना समवेत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून त्यांना मिष्ठान्न भोजन पंगत देण्यात येणार आहे . दुपारी साडेतीन वाजता संध्याछाया वृद्धाश्रम मालेगाव रोड येथे अन्नदानाचा कार्यक्रम होईल. दुपारी चार वाजता सिंधुताई पावडे पेट्रोल पंपावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे . याच ठिकाणी मित्र मंडळाच्या भेटीगाठी ही घेतल्या जातील . सायंकाळी पाच वाजता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त गरजूंना धान्याची किट वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मित्र आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेण्यात येतील अशी माहिती ही या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली आहे.
मुंबईतील आंदोलकांसाठी भोजन उद्या रवाना
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईत मोठे आंदोलन सुरू आहे . मनोज दादा स्वतः आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची कोणतीही उपासमार होऊ नये किंवा त्यांना खाण्यापिण्याचे अडचणी येऊ नयेत यासाठी मी माझ्या वतीने माझ्या स्वखर्चातून वीस हजार मराठा बांधवांना जेवण पुरेल इतके जेवण पाठवत आहे. या हे भोजन घेऊन जाणाऱ्या वाहनाला आज सकाळी हिरवी झंडी दाखविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
