नांदेड – सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे. लाभार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे येऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत “वीर परिवार सहायता योजना-2025” मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवाप्रदान करीत आहे. या योजनेचा उद्देश देशाचे संरक्षण करणारे सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रभावित करणाऱ्या वैयक्तिक आणि नागरी हक्काच्या कायदेशीरबाबींमध्ये सेवा प्रदान करणे आहे.
ही योजना सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना मालमत्ता आणि कौटुंबिक वाद, वारसा हक्काचे आणि वारसाचे प्रश्न, आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे, कल्याणकारी योजनेखालील लाभ मिळवणे, दिव्यांग अधिकार नियम 2016 अंतर्गत हक्क मिळवून देण्यासारख्या विविध कायदेशीर बाबीमध्ये मदत पुरवते.
या योजनेत डिजिटल सुविधांचा वापर करण्यात आला आहे. जसे Nalsa च्या लीगल सर्विसेस मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलद्वारे ई-फायलिंग, ई-कोन्सिलिंग, ई-मेडीएशन आणि ई-लोक अदालत या उपाय योजनेमुळे दुर्गम भागातही न्याय मिळवणे सोपे होईल.
ही योजना केवळ एक कल्याणकारी उपाय नाही तर देशाच्या संरक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कृती आहे. या योजनेमुळे देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबियांना त्यांच्या अनुपस्थित ही विश्वसनीय कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध होईल.
