नांदेड(प्रतिनिधी)-वर्ग-1 मधील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प हिंगोली येथील विशाल बजरंगसिंह चव्हाण यांनी उर्वरित लाचेच्या रक्कमेतील 25 हजार रुपये स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे.
मार्च 2025 मध्ये महिला व बालविकास विभाग अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागा हिंगोली जिल्ह्यात निघाल्या होत्या. या पदासाठी तक्रारदाराच्या पत्नीने अर्ज केला होता. त्यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चव्हाण याची भेट तक्रारदाराने घेतली आणि अंगणवाडी मदतनिस या पदावर निवड करण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी 50 हजार रुपये देण्यात आले होते.
पुढे दि.18 जुलै 2025 रोजी तक्रारदाराची पत्नी अंगणवाडी मदतनीस पदावर निवड झाल्याची माहिती प्राप्त झाली. 28 जुलै रोजी आपल्या कामावर रुजू होण्यासाठी ते बालविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण यांना भेटले तेंव्हा त्याने 80 हजारामध्ये उर्वरीत राहिलेली 30 हजार रुपये लाचेची रक्कम मागितली.
6 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली. त्यानंतर पडताळणी झाली तेंव्हा पंचासमक्ष विशालसिंहने अगोदर 50 हजार रुपये घेतले आणि राहिलेल्या 30 हजारामध्ये काही तरी कमी करा अशी मागणी केल्यानंतर तुम्हाला योग्य वाटेल ते करा असे विशालसिंह चव्हाणने सांगितले तेंव्हा तक्रारदाराने 25 हजार रुपये करते असे उत्तर दिले आणि विशालसिंह चव्हाणने पंचासमक्ष लाच स्विकारण्यास सम्मती दिली. 6 ऑगस्ट रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प हिंगोली येथे विशालसिंह बजरंगसिंह चव्हाण यांच्या कक्षात 25 हजारांची लाच स्विकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक विकास धनवट, पोलीस अंमलदार विजय शुक्ला, भगवान मंडलीक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, रविंद्र वर्णे, गोविंद पुंडगे, जाधव, शेख अकबर यांनी पुर्ण केली. या संदर्भाने हिंगोली शहर येथे विशालसिंह बजरंगसिंह चव्हाण विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगणवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी अडकला 25 हजारांच्या लाच जाळ्यात
