नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाचे पैसे घेवून तुम्ही पैसे का घेतले अशी विचारणा करण्यास गेलेल्या पैकी एकाचा खून करणाऱ्या दोन जणांना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी 6 वर्ष 5 महिने 12 दिवस अशी शिक्षा ठोठावली आहे. एवढे दिवस ते तुरूंगातच आहेत.
दि.19 मार्च 2019 रोजी शेख माजीद शेख रहेमान रा.फत्तेबुरूज इतवारा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 12 वाजेच्यासुमारास सुर-ए-इलाही या मस्जिदच्या बाजूच्या रस्त्यावर बरेच लोक जमा झालेले दिसले. त्या लोकांमध्ये आम्हाला पाहुन माझ्या भावाचा मुलगा आदील हा आमच्याजवळ आला आणि म्हणाला माझे 100 रुपये दोन अनोळखी लोकांनी बळजबरीने काढून घेतले आहेत. त्यानंतर आम्ही काही तेथे गेलो आणि विचारले की, तुम्ही पैसे का घेतले. तेंव्हा मध्ये बोलायची काही गरज नाही तुला दाखवू का असे सांगून त्यातील एकाने लाकडी दांड्याने आमच्यासोबतच्या सुलमानच्या नाकावर मारले व दुसऱ्याने डोक्यावर व पाठीवर मारुन गंभीर दु:खापत केली. त्या शेख सुलेमान यांच्या नाकातून रक्त निघाले. तो खाली पडल्यानंतर त्या दोघांनी लाकडाने त्याच्या पायावर सुध्दा मारहाण केली. तेंव्हा सुलेमानला आम्ही दवाखान्यात पाठविले. पण दवाखान्यात तो मरण पावला होता.तेथे जमलेल्या लोकांनी मारहाण करणाऱ्यांची नावे शेख जुनेद शेख मैनोद्दीन (20), शेख सोहेल शेख खादल (19) दोघे रा.लक्ष्मीनगर देगलूरनाका नांदेड असे होते.
यानंतर इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 61/2019 दाखल केला. त्वरीत 19 मार्च 2019 रोजी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक झाली. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास इतवारा येथील पोलीस उपनिरिक्षक शालीनी गजभारे यांनी केला. त्यानंतर हा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक फिरोज पठाण यांनी केला. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हा सत्र खटला क्रमांक 300/2019 प्रमाणे चालला. न्यायालयात या प्रकरणी आठ साक्षीदार तपासण्यातत आले. प्रत्यक्ष मारहाण पाहणाऱ्या साक्षीदार सुध्दा उपस्थितीत होते. न्यायालयासमक्ष आलेला लेखी व तोंडी पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने या खटल्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 304(2) प्रमाणे शिक्षा दिली आणि त्यात दोन्ही आरोपींना अटक झाली तेंव्हापासून आजपर्यंतचे गणित करून 6 वर्ष 5 महिने 12 दिवस अशी शिक्षा ठोठावली. सोबतच दोघांना प्रत्येकी 5 हजार रुपये असा दंड ठोठावला. या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी काम पाहिले. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि वंदना काळबांडे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.
खून प्रकरणात दोन जणांना 6 वर्ष 5 महिने 12 दिवसांची शिक्षा
