दुसरी वाळू कार्यवाही करणाऱ्या एपीआयची चौकशी
नांदेड(प्रतिनिधी)-दोन अधिकाऱ्यांनी काल वाळू संदर्भाने उत्कृष्ट कामगिरी केली. तरी पण त्यातील एकाची चौकशी लावण्यात आली आणि एकाला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. तसेच भाग्यनगर येथे नवीन पोलीस निरिक्षक पाठवून तेथील पोलीस निरिक्षक नियंत्रण कक्षात जमा झाले आहेत. या मागचे कारणे मात्र स्पष्ट होत नाहीत. कारण सध्या ई-मेलवर आदेश पाठविणे सुरू आहे. त्यामुळे आदेश लवकर कळत नाहीत असे झाले आहे. काही जण सांगतात अजून एक अधिकारी कालच कंट्रोल रुमध्ये बोलविण्यात आला होता. परंतू काही तासातच त्याला परत पाठविण्यात आले.
28 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास थुगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात तराफ्याने रेती काढण्याची माहिती मिळाल्यानंतर लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनकर, पोलीस उपनिरिक्षक एन.एम.सय्यद, पोलीस अंमलदार काझी, टाक, सहा गृहरक्षक दलाचे जवान यांनी तेथे छापा टाकला. तेथे 30 ब्रास रेती 1 लाख 50 हजार रुपयांची आणि रेती काढण्याचे 23 तराफे 11 लाख 50 हजार रुपयांचे पकडण्यात आले. त्यातील तराफे जाळण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी लिंबगाव पोलीसांचे कौतुक केले आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक 134/2025 मध्ये गंगाधर भोसले, मनिष भोसले, विक्रम भोसले, भास्कर भोसले, शंकर भोसले आणि शाम भोसले असे थुगाव येथील सहा आरोपी नमुद करण्यात आले आहेत.
दुसऱ्या एका माहितीप्रमाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार, ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार मधुकर टोनगे, दिलीपकुमार चंचलवार, मोहन हाके, रितेश कुलथे, लहु चाटे, मारोती मोरे, विश्र्वनाथ पवार, केंद्रे, पचलिंग आणि पवार यांनी भनगी शिवारात छापा मारला. त्या ठिकाणी रेती काढण्याचे 8 इंजन 16 लाख रुपये किंमतीचे, एक सोनालीका ट्रॅक्टर हेड 9 लाख रुपये किंमतीचे 54 तराफे 27 लाख रुपयांचे, 50 ब्रास रेती 2 लाख 50 हजार रुपयांची आणि एम.एच.26 सी.ई.3490 हे ट्रॅक्टर 12 लाख रुपयांचे असा 66 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 723/2025 मध्ये भनगी येथील नितीन रघोजी मोरे, संतुक उर्फ योगेश रामराव मोरे आणि रेती उपसा करणाऱ्या इंजनांचे मालक व पळून जाणारे इतर अशा पध्दतीने आरोपींची नावे नमुद आहेत. याचेही पोलीस अधिक्षकांनी कौतुक केल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 29 जुलै रोजी दुसरी वाळूची कार्यवाही केली. त्यात सुध्दा पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर व त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचा गुन्हा क्रमांक 721/2025 असा आहे. त्यात 4 लाख रुपयांच दोन इंजिन, चार तराफे 2 लाख रुपयांचे आणि 5 ब्रास वाळू 25 हजार रुपयांची असा 6 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त आहे. या प्रकरणातील आरोपी मात्र पळून गेले आहेत.
29 जुलैला रात्री कार्यवाही
या प्रकरणातील पंढरीनाथ बोधनकर यांच्यावर वाळू प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राथमिक चौकशी प्रस्ताविक करण्यात आली. तसेच पोलीस उपनिरिक्षक अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, संजय कळणे आणि अर्जून शिंदे यांना निलंबित करण्यात आले.
यानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री 11 वाजेच्यासुमारास पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण आणि पोलीस ठाणे विमानतळ येथे ईमेल पाठविण्यात आले. या ईमेलमध्ये नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले असे आदेश आहेत. त्यांच्या जागी सध्या नांदेड ग्रामीणमध्ये दुय्यम असलेले पोलीस निरिक्षक बाळासाहेब रोकडे हे कामकाज पाहत आहेत.

दुसरा ईमेल विमानतळ पोलीस ठाण्याचा आला असे सांगितले जाते. त्या ठिकाणी असलेले पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले असून त्यांच्या जागी पोलीस निरिक्षक चित्तरंजन कामठेवाड यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सोबतच अजून एका अधिकाऱ्याला कालच नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले होते. परंतू काही तासातच त्यांना परत पाठविण्यात आले. त्यांचे नाव समजले नाही.
नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर तिडके यांच्याविरुध्द दाखल झालेल्या एफआयआरमध्येच फिर्यादी असलेल्या पोलीस निरिक्षकांनी लिहिले आहे की, त्यांच्या कार्यालयातील सर्वानुमते फक्त ज्ञानेश्र्वर तिडकेवर लाच मागणी संदर्भाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला आहे आणि त्यानुसार गुन्ह्यामध्ये आरोपी या सदरात फक्त ज्ञानेश्र्वर तिडकेचे नाव आहे. मग पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरची चौकशी का आवश्यक आहे? यावर सुध्दा प्रश्न उपस्थित होत आहे.
