नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मिलगेट परिसरातील रहिवासी शेख रफीकोदिन शेख वहीदोदिन यांनी शहरातील वजीराबाद, खडकपूरा बसस्थानक, मिलगेट, दुले शाह रहेमान नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, मटका आणि जुगार अड्ड्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले असून, आता त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे थेट दखल घेण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेख रफी यांनी पोलीस अधीक्षक, नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “मी या परिसरात राहतो. आमच्या भागात व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत. यामुळे परिसरातील तरुण व प्रौढ व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.”ते पुढे म्हणाले, “मजुरी करून आपली उपजीविका करणाऱ्या अनेक व्यक्ती आता मटका खेळण्यातच वेळ घालवतात. काही तर दारू पिऊन रस्त्यावरच धिंगाणा घालतात. तरुण मुलं शिक्षणाकडे दुर्लक्ष करून जुगारात अडकत आहेत. यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे.”या परिसरातील नागरिकांची त्रासदी अधिक गंभीर बनली आहे कारण हा परिसर उच्चभ्रू वस्तीत मोडतो. येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होतो आहे. शेख रफीकोद्दीन यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली असून, डीआयजींना भावनिक आवाहन केले आहे की त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस कारवाई करावी.शेख रफीकिद्दीन यांनी दावा केला आहे की, “अशा घटनांबाबत वारंवार अर्ज करूनही जबाबदारी झटकली जाते. पुरावे मागितले जातात. म्हणूनच यावेळी आम्ही मटका व जुगार अड्ड्यांचे थेट व्हिडिओ आणि प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्तीचा क्लिप जोडून ही बातमी प्रसिद्ध करत आहोत. आता तरी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, हीच अपेक्षा.”
