नांदेड,(प्रतिनिधी)नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर भीमराव तिडके यांच्याविरुद्ध १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ जुलै २०२५ पासून सुरू होता, आणि अखेर काल हा गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस निरीक्षक माधुरी अजयराव यावलीकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देत ही कारवाई केली आहे. तक्रारीनुसार, एका व्यक्तीने फायनान्समार्फत खरेदी केलेला ट्रॅक्टर एजन्सीने मालकाच्या संमतीविना बळजबरीने परत घेतला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिला होता, जो तपासासाठी ज्ञानेश्वर तिडके यांच्याकडे पाठवण्यात आला होता.त्यावेळी तिडके यांनी “साहेबांना भेटून पैसे द्या, तरच कारवाई होते, नाहीतर अर्ज पडून राहतो,” असे सांगत तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, ७ मे २०२५ रोजी तिडके यांनी पुन्हा लाच मागितल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात तीन वेळा सापळा रचण्यात आला, परंतु तिडके त्यात सापडले नाहीत. दरम्यान, तक्रारदार शेख अजीस शेख जब्बार यांच्याविरुद्ध घरगुती गॅस भरण्याचे गुन्हे आधीपासूनच दाखल असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.विशेष म्हणजे, वास्तव न्यूज लाईव्हच्या हाती लागलेल्या माहितीप्रमाणे, तक्रारदार शेख अजीस यांनी २० मे २०२५ रोजी १०० रुपयांच्या मुद्रांकावर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई यांच्या नावे लिहिलेले एक पाच पानी शपथपत्र वास्तव न्यूज लाईव्हला प्राप्त झाले आहे . या शपथपत्रात त्यांनी “माझा उद्देश फक्त ट्रॅक्टर परत मिळवणे होता. लाच लुचपत पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवर मला न वाचता सही करायला लावली, त्यात काय लिहिले आहे हे मला ठाऊक नाही,” असे नमूद केले आहे. या शपथपत्रावर त्यांचा फोटो आणि आधारकार्ड जोडण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, २१ मे २०२५ रोजी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांना एक अर्ज दिला असून, “ज्ञानेश्वर तिडके यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही, आणि माझा अर्ज मी परत घेत आहे,” असे त्यात म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लाच मागणीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी २ जून २०२५ रोजी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांनी ऐतिहासिक ज्ञानेश्वर तिडके यांना मुख्यालयात सलग्न केले होते. कसुरी अहवालात त्यांच्यावर ‘कामात दिरंगाई’ आणि ‘कामाची गती अत्यंत धीमी’ असल्याचे नमूद होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार, पोलीस कर्मचारी किरण कणसे, ईश्वर जाधव, श्याम गोरपले आणि प्रकाश मामुलवार यांनी या कारवाईसाठी विशेष प्रयत्न केले.तक्रारदाराच्या भूमिकेत सुस्पष्टतेचा अभाव, तसेच त्यांच्याविरुद्ध पूर्वीचे गुन्हे व विविध शपथपत्रांतील विरोधाभास पाहता, हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असून ‘खरे काय?’ याचा निर्णय तपासानंतरच होणार आहे.
