मराठी का बोलत नाही म्हणून मारहाण;समस्त उत्तर भारतीय नागरिकांमध्ये दहशत

नांदेड़,(प्रतिनिधि)-मराठी का बोलता येत नाही या संदर्भाने उत्तर भारतीय समाजातील एका व्यक्तीला 23 जुलै रोजी दुपारी मारहाण झाली याबाबत वजीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सम्पूर्ण उत्तर भारतीय समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या अर्जानुसार मराठी बोलता का येत नाही म्हणून मराठी बोलण्याची सक्ती करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आज करण्यात आली आहे. मध्यवर्ती बस स्थानकात सुलभ शौचालयामधील एक कर्मचारी अमरीश कुमार उत्तर भारतीय आहे त्याला 23 जुलै रोजी दुपारी तीन ते चार वाजे दरम्यान काही गुंड प्रवृत्तीचे 15 ते 20 मनसे कार्यकर्ते अचानक सुलभ शौचालयात आले. तू मराठी मध्ये का बोलत नाहीस म्हणून मारहाण केली. नांदेडमध्ये अनेक उत्तर भारतीय लोक 30 ते 40 वर्षापासून रहिवासी आहेत. नांदेड शहरात पाच ते सहा हजार उत्तर भारतीय व्यक्तींची लोकसंख्या वास्तव्य करत आहे. त्यामध्ये व्यवसाय करणारे, रोजनदारी करणारे, छोटे छोटे व्यवसाय करणारे अनेक जण आहेत. पण त्यांना मराठी भाषा समजत असेल पण बोलता येत नाही दिलेल्या अर्जा प्रमाणे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. इतर समाज सुद्धा हिंदी भाषेचा वापर करीत असतो त्यामुळे हिंदी बोलणे काही चुकीचे नाही. फक्त काही राजकीय व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रसिद्धी मिळावी म्हणून ते उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करत आहेत. मारहाण करून व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत आहेत. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जावर अमरेश कुमार झा, अमरेश शुक्ला, प्रमोद कुमार मिश्रा, किशोर शर्मा, डॉक्टर शुभम महाजन, प्रिन्स झा आदी लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा क्रमांक 321/2025 दाखल केला आहे. पोलीसांनी शुभम बंटी पाटील (28) रा.सराफा नांदेड, योगेश्र्वर काशिनाथ मोरे (30) रा.सोनखेड, शक्तीसिंह हरीसिंह परमार रा.गोपाळनगर नांदेड आणि धम्मपाल मोतीराम आढाव (30) रा.बळीरामपुर या पाच जणांना बोलावून त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कायदा हातात घेवून कोणीही असे कृत्य करेल तर अशा व्यक्तीविरुध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!