नांदेड–मागील हंगामातील 17.50 कोटी बाकी प्रशासनाने कारवाई न केल्यास तळे ठोकू नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील एफ आर पी चे साडे सतरा कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याने प्रशासनाने कारखान्यावर तात्काळ आर आर सी कार्यवाही करून शेतकऱ्यांना थकीत एफ आर पी व्याजासह द्यावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने माजी चेअरमन गणपत भाऊ तिडके सेवानिवृत्ती देऊन त्यांच्या ठिकाणी नरेंद्र चव्हाण यांना चेअरमन पदाची खुर्ची बहाल केली. उच्चशिक्षित असलेल्या व्यक्तीला चेअरमन पदाची संधी दिल्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी याचा लाभ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आली. मागचा गाळप बंद होऊन चार-पाच महिने उलटले तरीसुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळाला नाही. मागील हंगामातील साडे सतरा कोटी रुपयांची एफआरपी कारखान्याकडे थकीत आहे. मागच्या हंगामात भाऊराव च्या युनिट क्रमांक एकने 4 लाख 21 हजार 375 लाख मॅट्रिक टन गाळप केले तर युनिट क्रमांक दोन मध्ये 2 लाख 25 हजार 25 मॅट्रिक टन असे एकूण जवळपास 6 लाख 49 हजार चारशे टन गाळप केले. कारखान्याने शेतकऱ्यांना केवळ प्रति टन 2500 रुपयांचा दर दिला. युनिट क्र 1 कडे अकरा कोटी 38 लाख 18 हजार व युनिट क्रमांक दोन कडे सहा कोटी दहा लाख 83 हजार असे एकूण 17 कोटी 49 लाख दहा हजार रुपये बाकी आहेत प्रति टन 275 रुपये बाकी आहे. नवीन चेअरमन आल्याच्या नंतर कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये कसलाही बदल झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला नाही उलट कारखान्याची तोड वाहतूक व्यवस्था बिघडली त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास झाला आणि मोठ्या प्रमाणावर कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना गेला. त्यामुळे उच्चशिक्षित चेअरमन चा आतापर्यंत तरी कारखान्याला काही उपयोग झाला असे दिसत नाही. त्यामुळे शेतकरी नाराज असून याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना निश्चितच भोगावे लागेल. साखर आयुक्त प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी भाऊराव कारखान्यावर कायदेशीर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना त्यांची थकीत असलेले 17 कोटी रुपये मिळवून द्यावे अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ऊसदर नियंत्रण मंडळाची माजी सदस्य तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.
