नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यशवंत महाविद्यालयात 22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील 190 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 39 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
या रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुण्या गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजर्षीताई पाटील या होत्या. जीवन एक शर्यत असून, या शर्यतीतून अनेक गोष्टीत बदल होत असतात. इथं जी संधी उपलब्ध करुन दिली आहे, त्या संधीचा लाभ सर्व युवक-युवतीनी घ्यावा, असे आवाहन आमदार श्रीजया चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षण घेत असताना गुरुजणांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांच्या विचार करा, आयुष्यात मिळालेल्या संधीच सोन करा असा संदेश गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजर्षीताई पाटील दिला. सध्या या जगात कौशल्यांला मागणी आहे. प्रत्येकाने आपल्यातले कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. आधुनिक जगात कौशल्याशिवाय प्रगती अशक्य असल्याचे मत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले.
या रोजगार मेळाव्यात एकूण 16 कंपन्यानी 711 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला. तर एकूण 397 उमेदवार उपस्थित होते. यापैकी 361 उमेवारांनी मुलाखती दिल्या तर त्यापैकी 190 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तर 39 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
