खुदबईनगर भागात पोलीसांची दादागिरी

नांदेड(प्रतिनिधी) 19 जुलै रोजी खुदबईनगर चौरस्ता येथे एका 55 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. त्यानंतर पोलीस विभागाने या भागात राहणाऱ्या सर्व सामान्य नागरीकांचे जगणे अवघड केले असल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांना देण्यात आली आहे. देण्यात आलेल्या निवेदनानुसार मी एका व्यक्तीच्या बद्दल अर्ज देत नाही तर सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास यातून मांडत आहे. पोलीस अत्यंत अतिरेकी पध्दतीने रात्री लोकांना मारहाण करत आहेत असा या निवेदनाचा आशय आहे.
दि.19 जुलै रोजी खुदबईनगर भागात एका व्यक्तीचा खून झाला. त्यातील दोन आरोपींना पकडून पोलीसांनी त्यांची धिंड काढली. याचा अर्थ असा होतो की, लोकांनी अशा माणसांना भिऊ नये, पोलीस त्यांच्या रक्षणासाठी तयार आहेत. पण 20 जुलै रोजीचा एक सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाला. त्यामध्ये 8 ते 12 दुचाकी गाड्यांवर 16 ते 24 पोलीस या भागात फिरत आहेत. नागरीकांना मारहाण करत आहेत. काही दुचाकी गाड्यांवरील युवक पोलीसांच्या भितीने खाली पडत आहेत. या प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवर रात्री 11 वाजताचा वेळ आहे. कायदेशीर कोणत्याही नागरीकाला किती वाजता त्याने घरी जावे, किंवा घरातून बाहेर कोणत्यावेळेस जावे याचा तर कोणता नियम अद्याप भारतात तयार झालेला नाही. परंतू व्यवसायीक आस्थापना रात्री 11 वाजता बंद व्हाव्यात हे सर्वांनाच मान्य आहे.
दिलेल्या निवेदनानुसार पोलीस कोणतीही चौकशी न करता आपली ताकत वापरत आहेत. घाणेरड्या शिव्या देत आहेत आणि असे प्रकार दररोज घडत आहेत. खुन करणाऱ्यांना अटक झाली आहे. खून तर तसा दिवसा झाला होता आणि रात्री 11 वाजता बरेच जण आल्या कामावरून घरी जातात. म्हणून खुदबईनगर चौरस्ता, देगलूर नाका या भागातील नागरीकांना आता पोलीसांच्या दादागिरीमुळे जगणे अवघड झाले आहे. निवेदनकर्त्याने लिहिले आहे की, मी कोणत्याही एका व्यक्तीगत घटनेबद्दल हा आवाज उठवत नसून पण अनेक लोकांचा आवाज मांडण्यासाठी हा अर्ज दिला आहे. माझ्या मते पोलीसांनी ताकत वापरण्यापेक्षा चौकशी करावी आणि चुकीच्या लोकांवर कार्यवाही करावी अशी विनंती या निवदेनात आहे. निवेदन शेख मोहसीन शेख शादुल्ला यांनी दिले आहे. यावर शेख शमशोद्दीन आणि ऍड. शेख जफर यांचीही स्वाक्षरी आहे.
संबंधीत व्हिडीओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!