नांदेड जिल्ह्यात मे महिन्यात गुटख्याची एकही कार्यवाही झाली नाही
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1 चालविले आहे. जनतेने अवैध धंद्यांची माहिती ईमेलवर पाठवून अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. मे महिन्यांमध्ये चार जिल्ह्यामध्ये मिळून एकूण 7 कोटी 78 लाख 96 हजार 605 रुपयांची मुद्देमाल जप्ती करण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारु, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बेटींग, गुटखा, अंमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय, वाळु उपसा व वाहतूक, अवैध प्र्रवासी वाहतुक या चुकीच्या कामांना आळा घालण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून 1 मे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1 चे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, सर्व उपविभागांचे पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधिक्षक सहभागी झाले होते. सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके देखील कार्यवाहीत सहभागी झाली होती. प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय विरोधी कार्यवाह्यांवर वैयक्तीक देखरेख ठेवली.
या मोहिमेत मे-2025 या महिन्यात अवैध व्यवसायीकांविरुध्द 1561 गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात गुटखा, दारु, मटका, जुगार, गांजा, अवैध दारु, व वाळू संबंधाने गुन्हे आहेत. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यात गुटखाची एकही कार्यवाही झाली नाही हे अत्यंत महत्वपुर्ण आहे. परभणी फक्त एक कार्यवाही झाली आणि सर्वाधिक कार्यवाही हिंगोली जिल्ह्यात 10 झाल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे नांदेड एकूण कार्यवाही 371, जप्त मुद्देमाल 3 कोटी 7 लाख 87 हजार 990 रुपये, परभणी एकूण कार्यवाही 376, जप्त मुद्देमाल 2 कोटी 16 लाख 73 हजार 594, हिंगोली एकूण कार्यवाही 403, जप्त मुद्देमाल 73 लाख 33 हजार 220 रुपये, लातूर एकूण कार्यवाही 400 जप्त मुद्देमाल 1 कोटी 81 लाख 1001 रुपया.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, दिसणाऱ्या अवैध व्यवसायाविरुध्दची माहिती नागरीकांनी नजिकच्या पोलीस ठाण्यात द्यावी. तसेच नागरीकांसाठी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in संकेतस्थळावर माहिती देवून अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा.
लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुध्द 1561 गुन्हे दाखल ;7 कोटी 78 लाख 96 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त
