राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
नांदेड(प्रतिनिधी) -जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून योगदान देणारे डॉ. दिनेश यशवंतराव निखाते यांना मराठवाडा हेल्थ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे एका शानदार समारंभात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्रीय व्यक्तिमत्व, प्रसिध्द दंतरोग तज्ज्ञ डॉ. दिनेश यशवंतराव निखाते यांनी नांदेड शहरासह किनवटसारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा दिली आहे. किनवट तालुक्यातील आदिवासी गोरगरीब जनतेची त्यांनी निःस्वार्थपणे रुग्णसेवा केली आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता डॉ. निखाते यांनी नांदेडहून किनवट येथे जाऊन आरोग्य सेवा दिली आहे. शेकडो रुग्णांना त्यांच्या आरोग्य सेवेचा लाभ झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना यावर्षीचा मराठवाडा हेल्थ आयकॉन पुरस्कार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी आ. अनुराधा चव्हाण, ए. श्रीनिवास, कल्याण पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आपणास मिळालेला हा पुरस्कार आपण रुग्णसेवेला अर्पण करतो, अशी प्रतिक्रीया डॉ. दिनेश निखाते यांनी व्यक्त केली. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
डॉ. दिनेश निखाते मराठवाडा आयकॉन पुरस्काराने सन्मानित
