नांदेड(प्रतिनिधी)-आज हिंगोली जिल्ह्यात विशेष पोलीस महानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षाचे उद्घाटन केले आणि पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या 13 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत जमा होणारा मुद्देमाल केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. ज्यामुळे 13 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्याच्या संदर्भाने जमा झालेल्या मुद्देमालाची हाताळणी पारदर्शकरित्या होईल. मुद्देमालाची डिजिटल नोंद घेतली जाईल. ट्रॅकींग आणि कोडद्वारे मुद्देमालाची ओळख होईल अशा प्रकारे एकूण संगणकीय प्रणालीद्वारे मुद्देमाल कक्षावर लक्ष राहिल. त्यामुळे मुद्देमालातील फेरफार रोखणे, न्यायालयीन प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढविणे शक्य होईल. केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थाप कक्षाची स्थापना जप्त मालमत्ता आणि पुराव्यांचे केंद्रीकृत आणि सुरक्षीत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे.

मुद्देमाल कक्षाचे महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे जप्त केलेली सर्व मालमत्ता आणि पुरावे एकत्रित केंद्रीय ठिकाणी ठेवण्यात येतील. तसेच ते सुरक्षीत राहतील. मुद्देमालामध्ये छेड-छाड होणार नाही. पुराव्यांची साखळी अबाधीत राहिल. पोलीस ठाणे आणि न्यायालय यांच्यातील समन्वय सुलभ करणे हा सुध्दा एक उद्देश आहे. सदरचे केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष जुन्या पोलीस मुख्यालयात वापरात नसलेली जागा वापरात घेवून स्थापन करण्यात आले आहे. या व्यव्सथापन कक्षावर सीसटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि पोलीस गार्डद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येईल.
हिंगोली येथील जुन्या पोलीस मुख्यालयात सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्यासह हिंगोलीतील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख, शाखा प्रमुख हजर होते. हे नवीन प्रकारचे केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष उभारण्यात हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के यांनी मोलाची भुमिका पार पाडली. मराठवाड्यात पहिल्यांदाच केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष हा नाविन्यपुर्ण उपक्रम तयार करण्यात आला आहे.

