नांदेड(प्रतिनिधी)-बारड जवळील एक बिअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 13 हजार 490 रुपयांचा विदेशी दारुचा साठा चोरला आहे. तरोडा (खु) येथे दोन जणांनी एक घरफोडून 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. आचेगाव शिवार ता.देगलूर येथील आखाड्यावरचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.
दिगंबर दामोधर कल्याणकर यांचे बारड जवळील पांढरवाडी शिवारात मराठा बार ऍन्ड रेस्टॉरंट आहे. दि.26 मे च्या रात्री 9.30 ते 27 मे च्या सकाळी 6 वाजेदरम्यान बिअर बारचा लोखंडी खिडकीचा पत्रा वाकून, कोंडा काढून कोणी तरी आत प्रवेश केला आणि बारमधील 1 लाख 13 हजार 490 रुपयांचा विदेशी दारु साठा चोरून नेला आहे. बारड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 65/2025 नुसार नोंदवली असून पोलीस अंमलदार भाडेकर अधिक तपास करीत आहेत.
लक्ष्मण दाजीबा तावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मे च्या मध्यरात्री नंतर 2.45 ते 3.15 वाजेदरम्यान अर्ध्या तासात शहरातील शिवनेरी रामा प्राईड खंडोबा चौक तरोडा (खु) येथील घराचा कडीकोंडा तोडून देवघरातील पुजेची चांदीची भांडी 1 किलो वजनाची किंमत 40 हजार रुपयांची आणि रोख रक्कम 25 हजार रुपये असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 300/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस अंमलदार गर्दनमारे अधिक तपास करीत आहेत.
हनमंत जयवंतराव पांचारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आसेगाव शिवार ता.देगलूर येथील शेत गट क्रमंाक 112 मधील टीनशेडचे साहित्य, लोखंडी पाईप, वायर बंडल असा 29 हजार 655 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी 26 मेच्या दुपारी 4 ते 27 मेच्या सकाळी 8 वाजेदरम्यान चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 265/2025 नुसार नोंदवली असून पोलीस अंमलदार तलवारे अधिक तपास करीत आहेत.
विदेशी दारु साठा चोरला; घर फोडले ; शेतातील साहित्याची चोरी
