मध्यप्रदेश सरकारमध्ये अर्थात भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले विजय शाह यांच्याविरुध्द मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अतुल श्रीधरण आणि न्यायमुर्ती अनुराधा शुक्ला यांनी 4 तासात गुन्हा दाखल करायला लावला. उच्च न्यायालयाने कर्नल सोफीया कुरेशी यांच्याबद्दल बोललेल्या शब्दांची दखल स्वत: घेतली. एफआयआर दाखल झाला. यावर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने पोलीसांना एफआयआरमधील भाषा बदलण्यास सांगितले आहे. आम्ही सांगितलेल्या शब्दांमध्ये तो एफआयआर हवा अशी तंबी मध्यप्रदेश पोलीसांना दिली आहे. त्यानंतर मंत्री विजय शाह सर्वोच्च न्यायालयात आले.

भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर आम्हाला वाचवा असा आर्जव करण्यात आला. न्यायमुर्ती गवई यांनी एफआयआर रद्द करण्याचा प्रकार उच्च न्यायालयात चालतो तेथे जा म्हणाले. पण हा एफआयआरच उच्च न्यायालयाने दाखल करायला लावला आहे. तेंव्हा उद्या या प्रकरणाची सुनावणी करू असे न्यायमुर्ती भूषण गवई यांनी सांगितले आहे. यावरुन आता मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा वाचवू शकतात की नाही हा प्रश्न तयार झाला आहे.
मध्यप्रदेशमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफीया कुरेशी यांना अतिरेक्यांची बहिण म्हणले. याच्याशिवाय सुध्दा भरपूर काही म्हटले. ते लिहुन आम्ही आमच्या लेखणीची इज्जत कमी करून घेवू इच्छीत नाही. या व्हिडीओची दखल मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमुर्ती अनुराधा शुक्ला यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल बोललेल्या शब्दांची दखल घेतली. कारण न्यायमुर्तींच्या शब्दात हा मंत्री गटारीची भाषा बोलतो, त्याने सैन्याचा अपमान केला. त्याने मुस्लिम समाजाचा अपमान केला आणि हा अपराध क्षमा करण्यासारखा नाही. त्यावेळी सरकारी अभियोक्त्यांनी न्यायमुर्तींना एक-दोन दिवसांचा वेळ मागितला तेंव्हा न्यायमुर्ती श्रीधरन म्हणाले की, उद्या मी मेलो तर म्हणून हा एफआयआर चार तासात दाखल व्हायला पाहिजे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत विजय शाह या मंत्र्याविरुध्द एफआयआर दाखल झाला नाही तर मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालकांची खैर नाही असेही सांगितले आणि न्यायामुर्तींच्या सांगण्याप्रमाणे एफआयआर दाखल झाला. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 152 ज्यामध्ये भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडता धोक्यात येवू शकते असे कृत्य. 156(1)(ब) मध्ये वेगवेगळ्या समुहांवर प्रभाव पाडणारे वक्तव्य करून ज्यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाली आहे किंवा भंग होण्याची शक्यता आहे. तसेच कलम 197(1)(सी) ज्यामध्ये घृणा, दुर्भावना एखाद्या गटाविरुध्द तयार करणे यांचा समावेश आहे. आज 15 मे रोजी सकाळी मंत्री विजय शाह विरुध्द दाखल झालेला एफआयआर उच्च न्यायालयात घेल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याचेही वाभाडे काढले आहेत. उच्च न्यायालयाच्या सांगण्याप्रमाणे या एफआयआरमधील भाषा आम्ही सांगितल्याप्रमाणे नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणे एफआयआरची भाषा हवी. याचा अर्थ आता तो एफआयआर बदलण्याऐवजी त्यात जोडणी करावी लागेल. म्हणजे पुरवणी जबाब घ्यावे लागतील.

उच्च न्यायालय मध्यप्रदेशने गुन्हा दाखल करायला लावल्यानंतर विजय शाह सर्वोच्च न्यायालयात आला. त्यांच्या सुदैवाने की, दुर्देवाने माहित नाही ते प्रकरण भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या समोर आले. त्यावेळी भूषण गवई यांनी सांगितले की, एफआयआर रद्द करण्याची प्रक्रिया ही उच्च न्यायालयात होत असते. सर्वोच्च न्यायालयात नाही त्यामुळे तुम्ही तिकडे जा. परंतू विजय शाहच्यावतीने सादरीकरणात सांगण्यात आले की, हा गुन्हाच उच्च न्यायालयाने दाखल करायला लावला आहे. तेंव्हा सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांनी उद्या दि.16 मे रोजी सुनावणीसाठी वेळ देवू असे सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी यांचे मुळ गाव मध्यप्रदेश राज्यातील छतरपुर जिल्ह्यात आहे. पुढे त्यांचे कुटूंब गुजरात राज्यात स्थायीक झाले. त्यांचे पणजोबा इंग्रज सरकारमध्ये अधिकारी होते. पण मंगल पांडेने 1857 चा उठाव केला तेंव्हा ते स्वातंत्र्य युध्दात सहभागी झाले. त्यांचे आजोबा मोहम्मद बिन भारतीय सैन्य दलात अधिकारी होते. त्यांचे वडील ताज महोम्मद कुरेशी भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रीकल ऍन्ड इंजिनेअरिंग विभागात अधिकारी होते. सोफिया कुरेशी या स्वत: कर्नल आहेत. त्यांचे पती कर्नल ताजोद्दीन हे तांत्रिक विभागात उच्च पदावर आहेत. कर्नल सोफिया कुरेशी यांचा 18 वर्षाचा मुलगा सलिम कुरेशी परंपरागत थल सेना सोडून वायु सेनेत जाण्यासाठी तयार आहे. त्याने त्यासाठीच्या आवश्यक परिक्षा दिलेल्या आहेत. कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासर कर्नाटक राज्यातील बेळगाम जिल्ह्यात आहे. असा दैदिप्यमान ईतिहास सोफिया कुरेशी यांचा आहे.
परंतू विजय शाह सारख्या काही मुर्खांना नदी ऐवजी नालाच आवडतो. अशांना प्रकाशाऐवजी अंधकार आवडतो. खरे तर विजय शाहचे बोलणे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तो चेहरा आहे. त्यांचे वागणे असेच आहे. सर्व जण असेच करतात. विजय शाहबद्दल बोलतांना पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले. मी आणि विजय शाह एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहोत. कॉलेजमधील विद्यार्थी प्रतिनिधी ही निवडणूक लढविण्यासाठी मी त्याला बाध्य केले होते आणि त्याला निवडूण पण आणले होते. परंतू तो पुढे आमदार झाल्यानंतर तो हैवान झाला. मध्यप्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार श्रवण गर्ग सांगतात. विजय शाहने कर्नल सोफिया कुरेशी बद्दलच असे बोलले नाही. त्याने एका कार्यक्रमात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्या पत्नीबद्दल सुध्दा आमच्यासोबत फिरत जा वहिनी असे शब्द वापरले होते. त्याला त्यावेळी मंत्री मंडळातून काढण्यात आले होते. परंतू विजय शाह आदीवासी समाजाचे नेतृत्व करतो आणि राजकारणामध्ये लागणाऱ्या मतदानाच्या गणिताच्या अनुरूप त्याला परत मंत्री बनविण्यात आले. मध्यप्रदेश हे राज्य आई आहिल्यादेवीची भुमी आहे आणि या भुमीत जन्म घेतलेला विजय शाह असा राक्षस का तयार झाला हे कळायला मार्ग नाही.
विजय शाहचा बोलण्याचा रोख कर्नल सोफिया कुरेशी या मुस्लिम आहेत म्हणूनच आहे. तसेच विक्रम मिसरी, हिमांशी नरवाल, बिहारमधील बीएसएफचे पोलीस उपनिरिक्षक मोहम्मद इम्तियाज यांच्या संदर्भाने सुध्दा जे काही प्रकरणे घडली. त्यात भारताच्या मुख्य मिडीयांनी त्या घटनांना स्थान दिलेले नाही. यावर बोलतांना श्रवण गर्ग म्हणाले. भारतातील हिंदी मिडीयाने आपला आत्मा विकला आहे. तो जातीयवादी झाला आहे. मागील 11 वर्षापासून घडणाऱ्या समस्यांमध्ये हिंदी मिडीयाने पसरविलेल्या जातीवादामुळेच अनेक समस्या भारतात तयार झाल्या आहेत असे र्गग यांना वाटते. चुकीच्या घटनांसाठी एकत्रित मत तयार करून हिंदी मिडीयाने भुमिकाच घेतली नाही. यापेक्षा इंग्रजी मिडीयाने थोडेफार चांगले केले आहे.
