नांदेड (प्रतिनिधी)- दि. 15 मेपासून नांदेडचे कौठा भागात गेलेले बसस्थानक पुर्ववत सुरू होणार असल्याचे पत्र राज्य परिवहन विभाग नांदेड येथील विभागीय नियंत्रकाने आज जारी केले आहे. यामुळे प्रवाशांच्या अडचणी आता कमी होतील असे मानावे लागेल.
आज जारी झालेल्या पत्रकानुसार दि. 14 एप्रिल 2025 पासून नांदेडचे मध्यवर्ती बसस्थानक कौठा भागातील मोकळ्या मैदानात हलविण्यात आले होते. त्यानंतर याचा फायदा ऑटोचालक, चोर यांनी सुद्धा घेतला. सोबतच महिलांना त्रास देण्याची वृत्ती असणाऱ्या लोकांनी सुद्धा याबद्दल बरेच वाईट अनुभव पाहिले. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, शौचालय नव्हते अशा अनंत घाणेरड्या परिस्थितीत या बसस्थानक एक महिना प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बसस्थानक ते रेल्वेस्थानक या अत्यंत वाईट अवस्थेतील रस्त्याचे नुतनीकरण झाले आहे. प्रवाशांना काही दिवस त्रास झाला परंतु असंख्य वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्थेत असलेला रेल्वेस्थानक ते बसस्थानक हा रस्ता अखेर दुरूस्त झाला, याचाही आनंद घ्यायला हवा.
बसस्थानक बदलल्याने काही प्रवाशांचे टप्पे बदलले होते. त्यासंदर्भाने सुद्धा विभागीय नियंत्रकांनी आदेश दिले आहेत की, बसस्थानकाच्या बदलेल्या टप्प्यांना बस वाहकांनी आपल्या तिकीट देण्याच्या मशीनमध्ये अद्यावत करावे, असेही आदेश दिले आहेत. 15 मे रोजी कामगिरी सुरू होण्यापूर्वी ईटीआय मशीनमध्ये सर्व टप्प्यांची माहिती भरून प्रवास भाड्यात होणारी वाढ आणि घट लक्षात घेऊन अद्यावत पद्धतीने प्रवाशांना तिकीट जनरेट करून द्यावे असे आदेशात म्हटले आहे.
