नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी दोन हायवा गाड्या पकडून चोरट्या वाळू वाहतुकीवर जरब आणला आहे. या प्रकरणी 90 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.11 मे रोजी मध्यरात्री 2-3 वाजेच्यादरम्यान आंबेसांगवी पाटीजवळ आणि हरसद पाटीजवळ सोनखेड पोलीसांनी दोन हायवा गाड्यांची तपासणी केली. त्यामध्ये चोरट्या पध्दतीने आणलेली वाळू भरलेली होती. दोन गाड्यांमध्ये प्रत्येकी 20 हजार रुपये किंमतीची 5 ब्रास वाळू आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश वाघमारे आणि दिगंबर कवाळे यांच्या तक्रारीवरुन गाडी क्रमांक एम.एच.26 सी.ए.8880 आणि एम.एच.26 सी.एच.7377 च्या विरुध्द गुन्हा क्रमांक 113 आणि 114 /2025 द ाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार एका हायवा गाडीचा चालक पळून गेल्याने त्याचा मालक आणि चालक अशा नावाने गुन्हा दाखल आहे. तर एका प्रकरणात केशव त्र्यंबक आढाव (36) रा.सुनेगाव ता.लोहा यांना आरोपी करण्यात आले आहे. गाड्या आणि गाड्यातील वाळू असा 90 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार शिंदे, वाघमारे आणि कवाळे यांनी ही कार्यवाही केली आहे.
सोनखेड पोलीसांनी 90 लाखांच्या दोन हायवा पकडल्या
