नांदेड(प्रतिनिधी)-14 एप्रिलच्या मध्यरात्रीचे 12 वाजताच विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह सुरू झाला. 14 एप्रिलची पहाट झाल्यानंतर वृत्त प्रकाशीत करेपर्यंत डॉ.भिमराव आंबेडकरांच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता.अनेक मान्यवरांनी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतले.
14 एप्रिलच्या मध्यरात्रीचे 12 वाजताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या भाविकांनी त्यांच्या नावाचा जयघोष करत आतिषबाजी केली. काही युवतींनी ढोल ताशांचा गजर करून आपल्या श्रध्देची सुमने अर्पण केली. डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेली रोषणाई, युवक, युवती, अबाल वृध्द, महिला, बालक-बालिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांच्या जन्मोत्सवाची सुरूवात केली. या शिवाय वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये सुध्दा रात्री फटाके वाजविण्यात आले आणि डॉ.आंबेडकरांच्या जन्मोत्सवाची सुरू झाली. 14 एप्रिल 2025 हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 134 वा जन्मोत्सव आहे.
14 एप्रिलचा सुर्योदय झाल्याबरोबर किंबहुना त्यावेळेच्या थोड्या अगोदरपासूनच जनसागर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी हळूहळू येत होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतले. त्यानंतर वृत्तप्रसिध्द करेपर्यंत हळूहळू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांसह असंख्य इतर धर्मिय मंडळी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी येत आहेत. दुपारनंतर विविध जयंती मंडळे आपल्या वस्तीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढतील आणि ही मिरवणूक रात्री उशीरापर्यंत संपेल. पोलीस विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी परिश्रम घेत आहे.