नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या मुलाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 60 वर्षीय आईनेच त्या मुलाचा खून केल्याची घटना दि. 5 एप्रिल रोजी रात्री धावरी खु. ता. भोकर येथे घडली आहे. मारेकरी आई सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
नरसप्पा नागा राऊत रा. धावरी खु. यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ बालाजी नागा राऊत वय 35, हा त्यांच्या शेतातील आखाड्यावर मरण पावलेला अवस्थेत सापडला आहे. ही घटना दि. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता उघडकीस आली. मरण पावलेल्या बालाजी राऊतच्या कानावर, डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार केल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक अजित कुंभार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण चौकशी करून भारतीय संहितेच्या कलम 103 नुसार गुन्हा क्र. 169/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार बालाजी नागा राऊत हा आपली आई नागाबाई वय 60, यांना नेहमीच दारू पिण्यासाठी पैसे मागत असे, आणि पैसे दिले नाही तर तो आईला मारहाण सुद्धा करत असे. बालाजी राऊतच्या 35 वर्षे वयातील बहुतांश काळ नागाबाईने त्याच्या जाचातच काढला. 5 एप्रिल रोजी नागाबाई आपल्या शेताच्या आखाड्यावर झोपण्यास गेल्यानंतर तेथे जाऊन हुज्जत घालणाऱ्या बालाजी राऊतला आई नागाबाईनेच काठीच्या सहाय्याने मारहाण करून त्याचा खून केला आहे. सध्या नागाबाई नागा राऊत वय 60, या भोकर पोलिसांच्या ताब्यात आहेत.