मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग- एक पदावर देखील झाली रुजू
नांदेड- दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पियनशिप व खेलो इंडिया या दोन स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार विजेती भाग्यश्री जाधव हिने गोळाफेक व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदके पटकावली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिने दिव्यांग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केले आहे. सन २०१९ पासून आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव महिला खेळाडू ठरली आहे. भागश्री जाधव हिने महाराष्ट्राबरोबरच देशाचे नेतृत्व केले आहे.
भाग्यश्री हिच्या क्रीडा प्रवासाची सुरुवात २०१७ साली पुणे येथे झालेल्या महापौर क्रीडा स्पर्धेपासून झाली. पहिल्याच स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. सन २०१८ मध्ये पंचकुला, सन २०१९ मध्ये चीन, सन २०२० मध्ये बंगळूरू, सन २०२१ मध्ये दुबई येथे, पोर्तुगाल, मोरक्को येथे , सन २०२३ मध्ये चीन येथील आशियाई क्रीडा स्पर्धा त्याच बरोबर खेलो इंडिया आदी ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. जपान येथे मे-२०२४ मध्ये झालेल्या पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले आहे. २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य तिला लाभले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव हिला मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने तिचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप तसेच खेलो इंडिया या स्पर्धेत भाग्यश्री जाधव हिने आपली चमकदार कामगिरी दाखवत गोळाफेक आणि भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात चार सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. या अतुलनीय कामगिरी बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे ती बालेवाडी, पुणे येथे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग- एक या पदावर दि.२ एप्रिल रोजी रुजू झाली आहे.
माझे मार्गदर्शक तथा गुरुबंधु ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, माझा परिवार,मुख्य क्रीडा प्रशिक्षक सी. सत्यनारायण (बंगळरू), सहाय्यक प्रशिक्षक सौ. पुष्पा मॅडम, दैनंदिन प्रशिक्षक रविंदर सर, मयूर रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर तसेच माझ्यावर उपकार करणारी सर्व डॉक्टर मंडळी,तसेच प्रसार माध्यमातील सर्व मान्यवर यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केली.