नांदेड :- भारतीय स्टेट बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर अंतर्गत एक 40 आसन क्षमतेची बस डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड यांना देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. ही बस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे नुकतीच सुर्पूद करण्यात आली. हा कार्यक्रम भारतीय स्टेट बँकेच्या शिवाजीनगर येथील प्रशासकीय कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी बँकेचे उप महाप्रबंधक प्रीयाकुमार सारीगाला, क्षेत्रीय प्रबंधक कालीदासू पक्काला, शाखा प्रबंधक गंगाधर कोंकटवार प्रबंधक मावन संसाधन रजत कुमार, मुख्य प्रबंधक सत्येंद्र कुमार, उप प्रबंधक प्रदीप शहारे व इतर बँक अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. आय. एफ इनामदार, सहयोगी प्राध्यापक डॉ. आर.डी. गाडेकर, प्रशासकीय अधिकारी खुशाल विश्वासराव, समाजसेवा अधिक्षक गजानन वानखेडे आदीची उपस्थिती होती.
भारतीय स्टेट बँक नेहमीच सीएसआर अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून या वैद्यकीय महाविद्यालयास उपलब्ध करुन दिलेल्या बसचा रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वापर होईल अशी अपेक्षा उपमहाप्रबंधक प्रीयाकुमार सारीगाला व्यक्त केली. भविष्यातही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विविध आरोग्य शिबिरे, क्षेत्र भेटी, अभ्यास दौरे इत्यादी शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांसाठी बसची नितांत आवश्यकता होती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बसच्या प्रस्तावास एसबीआयने त्वरीत मान्यता देवून देणगी स्वरुपात बस उपलब्ध करुन दिली. त्याबद्दल एसबीआय बँक प्रशासनाचे आभार मानले आणि यापुढेही त्यांच्याकडून रुग्ण हितासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, देवेंद्र जोग, अर्जून राठोड व संतोष मुंगल यांनी परिश्रम घेतले.