महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड :- येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१.०४.२०२५ रोजी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेतला.
नांदेड शहरातील नागरीकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासु नये तसेच दैनंदिन पाणी पुरवठा यंत्रणा ही सदोष असावी या हेतुने ही आढावा बैठक आयुक्तांनी घेतली आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपअभियंता दिलीप टाकळीकर, प्रकाश कांबळे, शिंदे यांची उपस्थिती होती.
नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे विष्णुपरी प्रकल्पातील एकुण ४३ द.ल.घ.मी. एवढा पाणी साठा आरक्षित करण्यात आला असुन सद्यस्थिती विष्णुपुरी जलाशयात ३२.६० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे आसना नदीमध्ये आपतकालीन परिस्थिती ओढावल्यास ६ द.ल.घ.मी. पाणी महापालिकेने आरक्षित केले असुन या आरक्षित पाण्यापैकी २ द.ल.घ.मी.चा पहिला टप्पा काही दिवसांत मागविण्यात येणार आहे. धरणात पाणी मुबलक प्रमाणात असतांना महानगरपालिकेची यंत्रणा नागरीकांना पाणी पुरवठा करण्यात कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता वर्गास दिले आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर शहरातील पाणी पुरवठा विभागासाठी महत्वाची कामे असणारी शारदा नगर, श्रीराम नगर, जे-३ नविन सिडको, लक्ष्मी नगर, मगणपुरा या ठिकाणी पाणी पुरवठा वाहीणी टाकण्याचे काम पूर्णत्वास येत असुन आसना नदी जलाशयावर गेट बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे यावेळी शहर अभियंता सुमंत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र व पंप हाऊस येथील सर्व मशिनरीज सुस्थितीत आहेत किंवा नाही? याचा सुध्दा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला.
त्याचप्रमाणे पाणी पुरवठा संबंधीत प्राप्त तक्रारीचा प्रथम प्राधाण्याने निपटारा करुन नागरीकांच्या अडचणी सोडविण्याच्या सुचना यावेळी आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच नजिकच्या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत शहरातील रस्त्याची कामे हाती घेण्यात येणार असुन सदरील कामा दरम्यान पाणी पुरवठा वाहीणी क्षतिग्रस्त होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले आहेत.
या बैठकीत एकंदरीत महानगरपालिका हद्दीत होणारा दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पाणी पुरवठा विभागातील सर्व अभियंता वर्ग व इतर कर्मचारी वर्गाने दक्ष राहण्याच्या सुचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. यावेळी शहरातील नागरीकांनी सुध्दा पाण्याचा वापर काटकसरीने करुन पाण्याची बचत करण्याचे आवाहना सोबतच नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी नांदेड शहरवासीयांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!