नांदेड (प्रतिनिधी)- वाढत्या उन्हामुळे शाळांना दुपारी 12 वाजेच्या अगोदर संपविण्याचा निर्धार करत पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी यांनी सर्व शाळांना तसे निर्देश जारी केले आहेत.
राज्यात वाढत असलेला उन्हाचा कडाका विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो आणि हा परिणाम टाळण्यासाठी शाळेची वेळ प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.45 अशी करण्याचे आदेश झाले आहेत. स्थानिक परिस्थितीत काही बदल असेल तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर या कालावधीमध्ये बदल करता येईल.
शाळेच्या व्यवस्थापनाने उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी व शारिरीक हालचाली करू नये आणि बाहेर मैदानात त्यांचे वर्ग घेऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षीत करावे. वर्गांमध्ये पंखे सुस्थितीत असावेत. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगावे की, टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या ज्यामध्ये उच्च पाणीसाम्रगी असते त्या फळे आणि भाज्या खाव्यात. विद्यार्थ्यांनी पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. डोळे झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर विद्यार्थ्यांना शिकवावा. उन्ह्याच्यावेळी बाहेर जाणे टाळावे परंतु आवश्यक असेल तर चप्पल किंवा बूट घालून जाण्यासाठी मार्गदर्शन करावे.
उन्ह्याच्या कडाक्याने शाळांच्या वेळेत बदल
