नांदेड(प्रतिनिधी)-परभणीचा जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-1 आणि परभणीचे जिल्हा क्रिडा अधिकारी वर्ग-3 या दोन अधिकाऱ्यांना नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रीय पथकाने गजाआड केले आहे. या दोघांनी 1 लाख रुपयांची लाच स्विकारली आहे. दोन्ही अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत आणि वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याविरुध्द नवा मोंढा परभणी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एका तक्रारदाराने अशी तक्रार दिली की, सन 2024 मध्ये परभणी येथे क्रिडा स्पर्धा आयोजित झाल्या होत्या. तक्रारदाराच्या क्रिडा ऍकॅडमीच्या जागेवर स्विमिंगपुलाचे 90 टक्के काम पुर्ण झालेले आहे. त्या 2024 च्या क्रिडा स्पर्धा आयोजन करण्याचे 5 लाख रुपये आणि स्विमींगपुलाच्या बांधकामाचे 90 लाख रुपये असे 95 लाख रुपयांचे बिल लोकसेविका आणि जिल्हा क्रिडा अधिकारी परभणी कविता सुभाष नावंदे (निंबाळकर) यांच्या कार्यालयात प्रलंबित होते.
दि.3 मार्च 2025 रोजी तक्रारदाराने कविता नावंदे आणि क्रिडा अधिकारी नानकसिंघ बस्सी यांची भेटे घेतली आणि आपले बिल मंजुर करुन देण्याची विनंती केली. तेंव्हा नावंदे यांनी स्वत:साठी 2 लाख रुपये आणि सहकारी क्रिडा अधिकारी नानकसिंघ बस्सी यांच्यासाठी 50 हजार रुपये असे 2 लाख 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. कविता नावंदे बिलामध्ये जाणूबुजून त्रुटी काढतील म्हणून इच्छा नसतांना सुध्दा तक्रारदाराने 13 मार्च रोजी कविता नावंदे यांना नानकसिंघ बस्सी यांच्या समक्ष 1 लाख रुपये दिले. पण उर्वरीत रक्कम 1 लाख 50 हजार देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 24 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणी येथे तक्रार दिली. 24 मार्च रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. परंतू लोकसेवकांशी भेट झाली नाही. म्हणून ही पडताळणी 25 मार्च रोजी पुन्हा करण्यात आली. त्यावेळी कविता नावंदे यांची भेट झाली. तक्रारदाराने कविता नावंदे यांना विचारणा केली असता त्यांनी कविता नावंदेंनी सांगितले की, बस्सी सर येतील, ते करून टाक असे सांगून उर्वरीत 1 लाख 50 हजारांची लाच स्विकारण्यास समती दर्शवली. लाच मागणी पडताळणीमध्ये कविता नावंदे यांनी रक्कमेचा स्पष्ट उल्लेख केला नाही. त्यासाठी 27 मार्च रोजी सापळा आयोजित करण्यात आला. 27 मार्च रोजी नानकसिंघ बस्सी यांनी स्वत:साठी 50 हजार आणि कविता नावंदे यांच्यासाठी 1 लाख अशी दीड लाख रुपयांची मागणी केली आणि तक्रारदाराला कविता नावंदे यांच्या कक्षात घेवून गेले. तेथे दोन्ही लोकसेवकांनी लाच स्विकारताच त्यांनाा ताब्यात घेतले आहे.
या प्रसंगी लोकसेविका असलेल्या कविता नावंदे यांच्या अंगझडतीमध्ये, त्यांच्या पर्समध्ये लाचेची 1 लाख रुपये रक्कम, त्या व्यतिरिक्त 6 हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल सापडला आहे. कविता नावंदे यांच्या परभणी येथील घराची झडती घेतली असता त्यामध्ये 1 लाख 5 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. कविता नावंदे यांच्या पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या घरांची घर झडती सुरू आहे. लोकसेवक नानकसिंघ महासिंघ बस्सी यांच्या नांदेड येथील घराची झडती सुरू आहे. कविता सुभाष नावंदे(निंबाळकर) आणि नानकसिंघ महासिंघ बस्सी या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7(अ) आणि 12 नुसार नवा मोंढा परभणी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नानकसिंघ महासिंघ बस्सी यांच्याविरुध्द सन 2017 मध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे भ्रष्टाचारासंबंधाने गुन्हा क्रमांक 534/2017 दाखल झालेला आहे. तो गुन्हा सध्या न्याय प्रविष्ट आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात परभणी येथील पोलीस निरिक्षक अलताफ मुलाणी, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलपत्रेवार, पोलीस अंमलदार रविंद्र भुमकर, अनिरुध्द कुलकर्णी, सिमा चाटे, अतुल कदम, नामदेव आदमे, राम घुले, शाम बोधनकर, आणि नरवाडे यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
महिला जिल्हा क्रिडा अधिकारी आणि सहाय्यक क्रिडा अधिकारी अडकले दीड लाखाच्या लाच जाळ्यात
