नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेकांना खोट्या शिधापत्रिका देणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 500 रुपयांमध्ये या खोट्या शिधापत्रिका तयार होत होत्या. परंतू शिधा पत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळत नव्हता. कारण त्या शिधापत्रिका बनावट होत्या. आजच्या परिस्थितीत एक गुन्हा दाखल झाला आहे. पण या एका गुन्ह्यामुळे बनावट शिधापत्रिका तयार होणे बंद होणार आहे काय ? याचे उत्तर मात्र अवघड आहे.
तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागाचे निरिक्षण अधिकारी रविंद्र पंजाबराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 मार्च रोजी त्यांच्याकडे नागेश दिनकरराव आष्टूरकर (51) हे व्यक्ती आले. जे कुलथे कॉर्नर सिडको येथे राहतात. त्यांनी राठोडला यांना सांगितले की, मी चार महिन्यापुर्वी शिधा पत्रिका क्रमांक 2720012750224 ही पीएचएच योजनेत घेतली आहे. त्यावर तहसील धर्माबाद असा शिक्का मारलेला आहे आणि इंग्रजीत स्वाक्षरी केलेली आहे. या शिधापत्रिकेचे निरिक्षण केले असता ती शिधापत्रिका नांदेड तहसील कार्यालयाने निर्गमित केलेली नाही असे दिसले. सोबतच ऑनलाईन पध्दतीने शिधापत्रिकेची तपासणी केली तेंव्हा ती शिधापत्रिका ऑनलाईनवर सुध्दा उपलब्ध नव्हती. ती शिधापत्रिका 12 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.45 वाजता सेतू सुविधा केंद्र सिडको येथील पेद्देवाड यांनी 500 रुपये घेवून बनवून दिली आहे. असे आष्टूरकरांनी रविंद्र राठोड यांना सांगितले. या अगोदर सुध्दा श्रीमती सत्यभामा धोेंडीबा बंडेवार, आरती नितीन स्वामी, छायाबाई माधव कांबळे, रजिया बी शेख पाशामियॉं, सुरेखा विनायक गवळी सर्व रा.सिडको यांनी सुध्दा अशाच तक्रारी केल्या होत्या की, आमच्याकडे शिधा पत्रिका आहे पण आम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. ही माहिती आम्ही तहसीलदार संजय वारकड यांना दिली. त्यानंतर संजय वारकड यांच्या आदेशानुसार तक्रार देत आहोत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3), 341(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 289/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मांटे यांच्याकडे देण्यात आला आहे. खोट्या शिधापत्रिका आजच बनत आहेत असे नव्हे. यापुर्वी सुध्दा अशी अनेक प्रकरणे समोर आली होती. तरी पण आज एक गुन्हा दाखल झाला म्हणजे खोट्या शिधापत्रिका बनणे थांबणार आहे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र अवघड आहे.
खोट्या शिधापत्रिका प्रकरणी सेतु सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल
