घाबरु नका ! आपण योग्य उपचार आणि काळजी घेतल्याने निश्चितच क्षयरोग संपवू शकतो

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी 25 टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात. परंतु योग्य उपचार व काळजी घेवून आपण क्षयरोग मुक्त होवू शकतो. आपण प्रत्येकाने जर निश्चय केला तर आपण क्षयरोग निश्चितच संपवू शकतो. प्रधानमंत्री महोदयांनी सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्यानुसार देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्राची सद्यस्थिती :- राज्यात सन 2024 मध्ये 2 लाख 30 हजार 515 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. सन 2025 साठी केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्यास 2 लाख 30 हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्ष्टि दिलेले आहे. राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 39 हजार 705 क्षयरुग्ण सापडले आहेत.

जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन 2030 अखेर क्षयरोगाचे दुरीकरण करणे अपेक्षित आहे. परंतु आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 दरम्यान राज्यातील क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्‍यान 20 मार्च 2025 अखेर राज्यात 40 हजार 471 क्षयरुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या क्षयरोगाकडे सर्वाच्या एकत्रित सहकार्याने लक्ष वेधण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी चांगली संधी आहे. क्षयरोगाच्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दरवर्षी एक घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने 24 मार्च 2025 साठी प्रसारित केलेले जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य

 

होय ! आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा, सेवा द्या.

या घोषवाक्यानुसार राज्यातून क्षयरोग संपविण्यासाठी आपण सर्वानी पुढील तीन बाबीवर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे.

प्रतिज्ञा करा- सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे.

तरतूद करा- नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी त्रुटी दुर करणे आणि प्रगतीशील संशोधन करणे यासाठी निधीची तरतुद करणे.

सेवा द्या :- क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतुदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सन 2025 पर्यत क्षयरोग दुरीकरण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

क्षयरोग दुरिकरणासाठी राज्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम :-

राज्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नियमित सर्वेक्षणाद्वारे तसेच सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व 100 दिवस मोहिमेसारख्या विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवून संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या छातीचा एक्सरे काढून व त्यांच्या बेडका नमुन्याची मशीनद्वारे व सुक्ष्मदर्शकाद्वारे मोफत तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करण्यावर भर देण्यात येत आहे. निदान झालेल्या क्षयरुग्णांना त्वरीत उपचाराखाली आणून क्षय रोगाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी राज्यशासनामार्फत 80 डिजीटल हॅन्ड हेल्ड एक्सरे मशीन खरेदी करुन जिल्ह्यांना वितरीत केल्या आहेत. बेडका नमुना तपासणीसाठी राज्यात 171 सीबीएनएएटी  मशीन व 624 ट्रयुनट मशिन्स विविध जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 2025 निश्चित सूक्ष्मदर्शक केंद्र कार्यान्वीत केले आहेत.

सन 2024 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागानने 35 लाख 39 हजार 941 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 दरम्यान 7 लक्ष 54 हजार 611 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले.

क्षयरोग प्रतिबंध औषधोपचार :-क्षयरुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची सी वाय टीबी चाचणी करुन पात्र व्यक्तींनी दर आठवड्याला क्षयरोग प्रतिबंधक औषधोपचाराची एक मात्रा याप्रमाणे 3 महिने प्रतिबंधक उपचार देण्यात येत आहेत.   

निक्षय पोषण योजना- क्षयरोगाचे निदान झालेल्या व उपचाराखाली असलेल्या रुग्णांचे उपचारादरम्यान योग्य पोषण होण्यासाठी केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेतून दरमहा 1 हजार रुपये याप्रमाणे रक्कम उपचार सुरु असेपर्यत त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरण पध्दतीने पीएफएमएसद्वारे अदा करण्यात येते. सन 2024 मध्ये 1 लाख 60 हजार 395 व सन 2025 मध्ये आजपर्यत 4 हजार 799 क्षयरुग्णांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान :- राज्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 13 हजार 351 निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार निक्षय मित्रांनी क्षयरुग्णांना केंद्र शासनाने प्रमाणित केलेले अन्नधान्य बास्केट प्रति क्षयरुग्ण दरमहा एक बास्केट याप्रमाणे कमीत कमी 6 महिने देण्यासाठी संमती दिलेली आहे. 20 मार्च 2025 पर्यत राज्यातील क्षयरुग्णांना निक्षय मित्रामार्फत 3 लाख 46 हजार 539 अन्नधान्य बास्केट वितरीत करण्यात आले. या अभियानाअंतर्गत सन 2023 मध्ये राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी 2 हजार 251 ग्रामपंचायती व सन 2024 मध्ये 7 हजार 402 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात राज्य यशस्वी झाले आहे.

क्षयरोग जनजागृती :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्व जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात येते.

राज्यात सन 2022 पासून तपासणी केलेल्या संशयित क्षयरुग्णांची व क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. वर्ष 2022 मध्ये तपासणी करण्यात आलेले संशयीत क्षयरुग्ण 19 लाख 98 हजार 356 यापैकी 2 लाख 33 हजार 872 क्षयरुग्णाचे निदान  झालेले आहेत. सन 2023 मध्ये 26 लाख 22 हजार 646 क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी 2 लाख 23 हजार 444 रुग्ण निदान झाले आहेत. सन 2024 मध्ये 35 लाख 39 हजार 941 रुग्णांची तपासणी करण्यात येवून त्यापेकी 2 लाख 30 हजार 515 क्षय रुग्णांचे निदान झाले. सन 2025 फेब्रुवारी अखेर 7 लाख 54 हजार 611 संशयित रुग्णांची तपासणी केली त्यापैकी 39 हजार 705 रुग्ण आढळून आले आहेत.

_अलका पाटील

उपसंपादक

जिल्हा माहिती कार्यालय ,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!