नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद येथे 15 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजारांची लाच स्विकारताच ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.18 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका व्यक्तीने तक्रार दिली की, नगर परिषद धर्माबाद येथील कर्मचारी दत्तु पोशट्टी गुर्जलवाड (52) हे माझ्या कामासाठी लाच मागत आहेत. तक्रारदाराप्रमाणे धर्माबाद नगर पालिकेच्या हद्दीत शिवाजीनगर येथे घर क्रमांक 438, 441 आणि त्यांच्या आईच्या नावे घर क्रमांक 443 अशी तिन घरे आहेत. तक्रारदारांच्या वडीलांनी या घराच्या क्षेत्रफळांच्या नोंदी नगर परिषद धर्माबादमध्ये करून घेण्यासाठी सन 2020 ते 2024 दरम्यान अनेक अर्ज केले आहेत. पण धर्माबाद नगर परिषदमधील लिपिक दत्तु गुर्जलवाड यांनी त्यांच्या वडीलांच्या कामासाठी 15 हजार रुपये लाच द्यावी लागेल असे सांगितले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 19 आणि 20 मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी केली. तेंव्हा पुन्हा एकदा 15 हजार रुपये आणि त्याच्यासाठी प्रत्येक प्लॉटचे 1000 रुपये असे एकूण 18 हजार रुपये मागितले. त्यानंतर तक्रारदारने विनंती केल्यानंतर दत्तु गुर्जलवाडने 15 हजार रुपये स्विकारण्यास सहमती दर्शवली.
21 मार्च रोजी पोलीसांनी धर्माबाद नगर परिषद कार्यालयात रचलेल्या सापळ्यात लिपीक दत्तु गुर्जलवाड 15 हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंग झडतीमध्ये 775 रुपये आणि एक मोबाईल सापडला. त्याच्या घराची झडतीपण घेण्यात आली.
पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रकाश वांद्रे, पोलीस अंमलदार शेख रसुल, कनसे, रापतवार, आचेवाड यांनी ही कार्यवाही केली आहे.
नगर परिषद धर्माबादचा लिपीक 15 हजार रुपये लाच स्विकारून गजाआड
