नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा

 

नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने सहभागी होणार 

नांदेड,( प्रतिनिधी)- बौद्ध्यत्तरांच्या ताब्यात असलेले विहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध गया हे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मी यांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी नांदेड येथे येत्या २५ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील समस्त भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच जिल्ह्यातल्या विविध आंबेडकरी राजकीय- सामाजिक संघटनांनी या महामोर्चाचे आयोजन केलेले आहे.

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धविहार गेली वर्षांनवर्षे बौद्ध्यत्तरांच्या ताब्यात आहे. विशेषतः हिंदू धर्मीयांनी बुद्धविहाराचे व्यवस्थापनावर ताबा घेऊन मनमानी चालवली असून बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट १९४९ नुसार हा ताबा असल्याने बौद्ध धर्मीय भिक्खू आणि बौद्ध अनुयायींच्या न्याय हक्कावर गदा आणली आहे. त्यामुळे सदर कायदा तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतभर बौद्ध भिक्खू आणि अनुयायींनी व्यापक आंदोलन छेडले आहे.

बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यात मुक्ती आंदोलन महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवीन मोंढा नांदेड येथे दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायींचा जमाव जमणार आहे. नवा मोंढा मैदान येथून महामोर्चाची सुरुवात होणार असून नियोजित भगवान बुद्ध पुतळा, महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर, कलामंदिर, वजीराबाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चाचा मार्ग राहणार आहे. महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पोहोचल्यानंतर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा आयोजकांच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती महामोर्चा संयोजन समितीच्या वतीने संयुक्त प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!