नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारीच्या गोळीबार घटनेत आज दहशतवाद विरोध पथकाने तीन जणांना न्यायालयात आणल्यानंतर मकोका विशेष न्यायालयाने तिघांना 21 मार्च अर्थात 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील तिन आरोपी अगोदरच मकोका न्यायालयाच्या आदेशाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या गोळीबार प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 आरोपी आहेत आणि 9 वा आरोपी जगजितसिंघ उर्फ जग्गी याला दहशतवाद विरोधी पथकाने पंजाबमध्ये पकडले आहे.
दि.10 फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात दुचाकीवर बसलेल्या दोन व्यक्तीवर एका व्यक्तीने गोळीबार केला. या दुचाकीवर मागच्या बाजूला गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार (35) हा बसला होता. दुचाकी चालविणारा रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (30) हा होता. गोळीबार करणाऱ्याने गुरमितसिंघ सेवादारवर गोळीबार केला. त्याच्या शरिरातून बाहेर निघालेल्या गोळ्या रविंद्रसिंघ राठोडला लागल्या. या हल्यात तो मरण पावला. गुरमितसिंघ सेवादारच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला. गुरमितसिंघ सेवादार सध्या कैदी आहे. तो पॅरोल रेजेवर आलेला आहे.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आणि दोन दिवसात हा गुन्हा तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग झाला. त्यानंतर या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक झालेली आहे. त्यात प्रत्यक्षात गोळीबार करणारा आरोपी सुध्दा आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. मनप्रितसिंघ उर्फ मन्नू गुरबक्षसिंघ ढिल्लो उर्फ नहेंग (31), हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर(25), अर्शदीपसिंघ भजनसिंघ गिल (22) रा.धरुमपट्टी, तरणतारण (पंजाब), दलजितसिंघ उर्फ जित्ता करमजितसिंघ संधू (41) रा.नांदेड, हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (32), जगदीशसिंघ उर्फ जग्गा सुखवंतसिंघ खैरा, हरकेपतन जि.तरणतारण, शुभदिपसिंघ उर्फ शुभ गुरविंदरजितसिंघ औलख रा.अमृतसर पंजाब, पलविंंदरसिंघ उर्फ पिंदा अवतारसिंघ बाजवा (30) रा.नांदेड असे आहेत. यापैकी गोळीबार करणारा जगदीशसिंघ उर्फ जग्गा, शुभदिपसिंघ उर्फ शुभ आणि पलविंदरसिंघ उर्फ पिंदा बाजवा या तिघांना मकोका विशेष न्यायालयाने 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. आज दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्र्वर रेंगे, पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे आणि पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरबक्षसिंघ ढिल्लो उर्फ नहेंद (31), हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर (25) रा.नांदेड, अर्शदिपसिंघ भजनसिंघ गिल (22) रा.पंजाब या तिघांना न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी हे आरोपी आपसात वायर सेक्युअर मसेंजर ऍपद्वारे आपसात बोललेले आहेत. त्यामुळे या सर्वांची एकत्रीत विचारपुस आवश्यक आहे. हा गुन्हा घडविण्यासाठी कोणत्या मार्गाने पैशांचा पुरवठा झाला. याचा तपास करणे आहे. म्हणून या तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मकोका विशेष न्यायालयाने या तिघांना सहा दिवस अर्थात 21 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नव्वा आरोपी पंजाबमध्ये पकडला
या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासानुसार या गुन्ह्यात सहभागी असलेला जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबासिंघ संधू यास पंजाब राज्यात पकडण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अद्याप मकोका न्यायालयात वाढीव पोलीस कोठडीसाठी आणण्यात आलेले नाही.
10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात 9 वा आरोपी पंजाबमध्ये पकडला ; तिन जणांना सहा दिवस वाढीव पोलीस कोठडी
