*८० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल १० ट्रक माल जप्त*
नांदेड:- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दिनांक ०७. मार्च २०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस विभागाने संयुक्तपने गुरुव्दारा परिसरातील संचखंड श्री हुजुर साहेब गेट नं.१ ते लंगरसाहेब रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढून टाकन्यात आले. या कारवाईत ८० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल १० ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. गुरुव्दारा मुख्य रस्त्यावरील रहदारीस व पदचाऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याच्या हेतुने ही कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, पोलीस निरीक्षक कदम, वाहतुक पोलीस निरीक्षक श्री गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सानप, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, क्रिडा व सांस्कृतिक अधिकारी तथा क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, मुख्य उद्यान अधिक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, कनिष्ठ अभियंता श्री किरण सुर्यवंशी, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, राजेश जाधव अतिक्रमण पथक प्रमुख श्री विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते व पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
नांदेड शहरातील तख्त संचखंड श्री हुजुर साहेब गेट नं.१ ते लंगरसाहेब रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेल्या अतिक्रमणाबाबत श्री जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी महाराष्ट्र सरकार विरुध्द जनहित याचिका क्र.११४/२०१८ व रिट पिटिशन क्र.७६२५/२०१८ तसेच अवमान याचिका क्र.१५१/२०२० दाखल केल्यानुसार मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदरील अतिक्रमण काढण्यासाठी आदेश पारीत केले आहेत. त्याअनुषंगाने स.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतुने सदरील कारवाई करण्यात आल्याचे *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी सांगितले.
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे महापालिका प्रशासनातर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले.