जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष उपक्रम

स्वच्छता जनजागृतीसह महिलांचा सन्मान करण्‍यात येणार;मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांची माहिती

नांदेड- जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या 8 मार्च रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय आणि राज्य पाणी व स्वच्छता विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात माहिती दिली.

जागतिक महिला दिनानिमित्‍त जिल्ह्यातील स्वच्छता व पाणी व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गाव पातळीवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये विशेष महिला सभा घेऊन पाणी स्वच्छता व आरोग्यविषयक समस्या तसेच उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्‍वंय सहाय्यता गट, महिला स्वच्छता कर्मचारी, किशोरवयीन मुली, ग्राम आरोग्य व पोषण समिती सदस्य तसेच स्थानिक महिला नेतृत्व यांचा सहभाग असणार आहे.

महिला दिनानिमित्त गाव स्तरावर वॉश रनचे आयोजन करावे. यात गावपातळीवरील सर्वांचा सहभाग घेण्‍यात यावा. याशिवाय, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, गटचर्चा या माध्यमातून पाणी व स्वच्छता क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला अधोरेखित केले जाणार आहे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन, पिण्‍याच्‍या पाण्‍याची चाचणी तसेच इतर नवोपक्रमांवर आधारित विशेष प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्‍याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाव्‍दारे एक महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायत तयार करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. समाज माध्यमांव्‍दारे महिलांच्या प्रेरणादायी कथा प्रसारित करून जनजागृती केली जाणार आहे.

या कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!