नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने दोन अपर पोलीस महासंचालकांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. पाच विशेष पोलीस महानिरिक्षकांना अपर पोलीस महासंचालक पदी पदोन्नती दिली आहे. दोन पोलीस उपमहानिरिक्षकांना विशेष पोलीस महानिरिक्षक पदोन्नती दिली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन विशेष पोलीस महानिरिक्षकांना नवीन नियुक्ती दिली आहे. यासोबतच एका अपर पोलीस अधिक्षकाला बदली आणि पाच सहाय्यक पोलीस अधिक्षकांना अपर पोलीस अधिक्षक ही पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच चार पोलीस उपअधिक्षकांची पुर्वीची बदली बदलण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि 4 राज्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या सुधारीत बदल्या जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागातील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश 28 फेबु्रवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. त्यात अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता यांना अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.महामार्ग सुरक्षा पथकाचे अपर पोलीस महासंचालक सुरेश मेखला यांना अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) येथे पदोन्नती देण्यात आली आहे.
पाच विशेष पोलीस महासंचालकांना अपर पोलीस महासंचालक अशी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात सायबर विभागाचे आय.जी.यशस्वी यादव यांना अपर पोलीस महासंचालक सायबर विभाग हे पद उन्नत करून तेथेच पदस्थापना दिली आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाचे आयजीपी सुहास वारके यांना अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पदोन्नती मिळाली आहे. महिला व बाल अत्याचार विभागाच्या विशेष पोलीस महानिरिक्षक अश्र्वती दोर्जे यांना अपर पोलीस महासंचालक महिला व बालअत्याचार प्रतिबंधक विभाग तसेच नागरी हक्क संरक्षण या विभागाचे पद उन्नत करून दोन विभाग देण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) येथील छेरिंग दोर्जे यांना अपर पोलीस महासंचालक विशेष अभियान या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक आस्थापना येथील के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांना अपर पोलीस महासंचालक(प्रशासन) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस बलगटाचे पोलीस उपमहानिरिक्षक राजीव जैन यांना ते पद उन्नत करून तेथेच विशेष पोलीस महानिरिक्षक पद बहाल करण्यात आले आहे. अभिषेक भगवान त्रिमुखे हे अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई यांना अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई येथेच नियुक्ती देण्यात आली आहे.
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले विशेष पोलीस महानिरिक्षक, केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून हजर झालेले मनोजकुमार शर्मा यांना विशेष पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक आर.बी.डहाळे यांना विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य गुन्हे अभिलेख केंद्र पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल गटाचे विशेष पोलीस महानिरिक्षक अशोक मोराळे यांना विशेष पोलीस महानिरिक्षक मोटार परिवहन विभाग पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे.
आयपीएस अधिकारी असलेले तथा गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे अपर पोलीस अधिक्षक असलेले श्रेणीक लोढा यांना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अपर पोलीस अधिक्षक हे पद देण्यात आले आहे.
राज्यभरात सहाय्यक पोलीस अधिक्षक या पदावर उपविभाग सांभाळणारे पाच आयपीएस अधिकारी यांना अपर पोलीस अधिक्षक ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात 2018 च्या आयपीएस तुकडीतील सहाय्यक पोलीस अधिक्षक मालेगाव जि.नाशिक येथील तेगबिरसिंघ संधू यांना मालेगाव येथेच अपर पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे. सन 2019 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी, नांदेड जिल्ह्यातील भोकर विभागात सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेल्या शफकत आमना यांना धाराशिव येथे अपर पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे. माजलगाव जि.बीड येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेले धीरजकुमार बचु यांना अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे. लोणावळा जि.पुणे येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेले एम.व्ही.सत्यसाई कार्तिक यांना अपर पोलीस अधिक्षक आहेरी जि.गडचिरोली येथे पदनियुक्ती मिळाली आहे. फैजपुर जि.जळगाव येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेल्या अन्नपुर्णासिंह यांना अपर पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहे.
याच आदेशात अनिकेत भारती, पंकज कुमावत, गौहर हसन, सुनिल लांजेवार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणाकर आहेत आणि त्यांच्या नियुक्तीचे नवीन आदेश स्वतंत्रपणे निर्गमित होणार आहेत. राज्य सेवेचे अशोक थोरात यांच्या संदर्भाने सुध्दा नियुक्तीचे नुतन आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जाणार आहेत.
राज्य सेवेतील चार पोलीस उपअधिक्षक अनिल प्रल्हादराव पात्रुडकर, शंकर शाहु खटके, शंकर श्रीरंग बाबर आणि आनंदराव तुकाराम खोबरे यांच्या बदल्या शासनाने 20 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग या पदावर केल्या होत्या. परंतू 28 फेबु्रवारीच्या आदेशांमध्ये त्यांच्या बदल्या सुधारीत करून अपर पोलीस अधिक्षक (एटप) गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य येथे करण्यात आल्या आहेत.