नांदेड(प्रतिनिधी)-ऑक्टोबर 2024 मध्ये वाईन शॉपमध्ये दारु विक्रीतून जमा झालेले पैसे 2 लाख 75 हजार रुपये बळजबरीने चोरणाऱ्या चार जणांपैकी दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आणि दोन जणांना भाग्यनगर पोलीसांनी पकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी 60 हजार रुपये किंमतीची आणि 30 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास राजेश नारायण सावंत यांच्या हातातील 2 लाख 75 हजार रुपयांची बॅग बळजबरीने हिसकावून नेण्यात आली होती. त्यावेळी चार जण या घटनेत सहभागी झाले होते. राजेश सावंत हे विको वाईन शॉपचे व्यवस्थापक आहेत. त्या दिवशीची दारु विक्रीची रक्कम 2 लाख 75 हजार रुपये लुटली गेली होती.
या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 516/2024 दाखल झाला होता. याप्रकरणातील श्रीनिवास उर्फ आदित्य अनिल जाधव (19) रा.दिलीपसिंघ कॉलनी नांदेड आणि अंकुश गजानन गंधनवाड (19) रा.नरोबामंदिराजवळ नवीन कौठा नांदेड यांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली. त्यानंतर भाग्यनगर पोलीसंानी या गुन्ह्याच्या तपासात गणेश शाम कोटूरवार (25) रा.रविनगर कौठा आणि विकास सुरेंद्र लोट (24) रा.दिलीपसिंघ कॉलनी नांदेड यांना पकडले. या आरोपींकडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.जी.7762 जप्त केली आहे.
अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार गजानन किडे, विशाल माळवे यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
दारु विक्रीचे पैसे बळजबरी चोरणाऱ्या चार जणांना अटक
