नांदेड (प्रतिनिधी)-जय शिवाजी, जय जिजाऊंच्या गर्जनेत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरातील अश्वारूढ पुतळा परिसरात हजारो मावळ्यांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नतमस्तक होत अभिवादन केले. दिवसभर अभिवादनासाठी रिघ सुरूच होती. तर मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शहरातील मुख्य चौक व रस्त्यालगत भगवे ध्वज मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महराज यांच्य पुतळा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
जयंतीचा मुख्य सोहळा बुधवारी पार पडला. काही मंडळांनी समाजपयोगी तर काही मंडळाची प्रबोधनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले. तर जय शिवाजी, जय जिजाऊंच्या गर्जनेत शहरातून दुचाकी रॅलीसह ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच शिवरायांच्या अश्वरूढ पुतळा परिसरात मावळ्यांची रिघ लागली होती. हजारो मावळे, राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवचरणी नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी खा. अशोकराव चव्हाण, खा. रविंद्र चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. श्रीजया चव्हाण, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर, माजी आ. डि. पी. सावंत, मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेकांनी अभिवादन केले. सायंकाळनंतर शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. यात बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी राजे यांच्यासह गड किल्ल्याचे देखावे सादर करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवान करण्यासाठी मावळ्यांची रिघ कायम होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.