• पालमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी केले हितगुज
• चित्ररथाच्या सादरीकरणाचेही कौतुक
नांदेड :- 76 व्या प्रजास्त्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात आज अनेक मान्यवरांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. काहींना त्यांच्या उपलब्धीसाठी तर काहींना विशिष्ट सेवेसाठी मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी चित्ररथांनी देखील मैदानावरील पथावर संचलन केले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
*स्वातंत्र्य सैनिकांशी हितगुज*
ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. यावेळी त्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत घटनेच्या प्रास्ताविकेचे फोटो देण्यात आले. यावेळी बाबुराव भानुदास जोशी, गयाबाई व्यंकटराव कर्डीय, गंगाबाई शामराव नरंगळे, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुर्यकांता गंगाधरराव गणमुखे, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, सुमंत त्र्यंबकराव कुलकर्णी, प्रेमिलाबाई रामराव अंबुलगेकर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
*संविधान प्रास्ताविकेचे वितरण*
यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान अभियानांतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वितरण केले.
*पुरस्काराचे वितरण*
पोलीस विभागातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक संजय जोशी, भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस हवलदार दिलीप राठोड, ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेल्या शेतकऱ्यांमध्ये खैरगाव येथील रामदास लांडगे, हनवता चव्हाण, सोमनाथ सिनगारे, विजय लंगडे, गंगाधर बासरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
*विद्यार्थ्यांना टॅब वाटप*
यावेळी विजाभज प्रवर्गातील आश्रम शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे टॅब वाटप करण्यात आले. विजाभज प्रवर्गातील आश्रमशाळेतील हे 5 विद्यार्थी असून बारावी विज्ञानमध्ये शिकत आहेत. यामध्ये प्रतिक्षा पवार, अश्विनी राठोड, आरती लिमकर, माऊली जगदाडे, दत्ता आडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
*ग्रामपंचायत विभाग*
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत उल्लेखनीय कार्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील सरपंच प्रतिक्षा पवार, ग्रामपंचायत अधिकारी शैलेंद्र वडझकर, पंचायत विभागाचे आनंद गुणाजी राहटीकर, सचिन पंडितराव सोनुने, मधुकर मानसिंग मोरे यांना पंचायत विभागातील विविध उपलब्धीबाबत पुरस्कृत करण्यात आले. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार भोकर तालुक्यातील नागपूर ग्रामपंचायतला देण्यात आला. द्वितीय पुरस्कार हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतला देण्यात आला तर तृतीय पुरस्कार कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचोलीला देण्यात आला.
*पथकाचे पथसंचलन*
परेड कमांडर डॉ. अश्विनी जगताप यांच्या संचलनात आज अनेक पथकांनी पथसंचलन केले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीसबल मुदखेड नेतृत्व निशान सिंह, सय्यद इरफान, जलद प्रतिसाद पथक नेतृत्व योगेश बोधगिरे, वशिष्ठ बिक्कड, पोलीस मुख्यालयाचे दंगा नियंत्रण पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, उमेश कदम, सशस्त्र पोलीस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे, सुरेश टेंगसे, सशस्त्र महिला पोलिस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शालीनी गजभारे, श्रीमती किरण बेंबडे, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे, प्रदीप साखरे, गृहरक्षक दल पुरूष पथक नेतृत्व बळवंत अटकोरे, रवी जनकुट, गृहरक्षक दल महिला पथक नेतृत्व श्रीमती छाया वाघमारे, श्रीमती मंगल बाराते, अग्निशामक दल प्लाटून अग्निशम अधिकारी निलेश कांबळे, सगरोळीचे राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय नेतृत्व शिवराज कदम, मोहित रावणगावकर, राष्ट्रीय छात्रसेना पथक नेतृत्व स्वराज बोरगावे, कु. रंजना यादव, महसूल पथक मंडळ अधिकारी हयुन पठाण, ग्राम महसूल अधिकारी राजकुमार मुंडे, स्काऊट पथक महेश डोबाळे, करण येनगेवाड, एसपीसी प्लाटून शिवांशू मिनू, पोलीस बॅड पथक पीएसआय बी. आर. वाघमारे व सहकारी कर्मचारी, चार्ली (पोलीस विभागाचे मोटार सायकल रायडर) पोलीस कॉ. बंदुके, कैलासे, गायकवाड, बोकारे, श्वान पथक (डॉग स्कॉड युनिट) श्वानाचे नाव आजाद नेतृत्व लकडे, वाहेद बेग, श्री केंद्रे, मार्क्समॅन वाहन नेतृत्व सचिन घोगरे, रेड्डी. बॉम्ब शोधक व नाशक पथक नेतृत्व प्लाटून कमांडर सोनकांबळे, प्रविण चंदेल, डायल 112 वाहन सय्यद मोईन, दंगा नियंत्रण वाहन नेतृत्व श्री स्वामी, जायभाये, अग्निशमन दलाचे वाहन अग्निशामक अधिकारी के. एस. दासरे, प्रकाश ताटे, 108 रुग्णवाहिका डॉ. रमेश वरवटकर व चालक देविदास किर्तन यांचा समावेश होता.
*विविध विभागाचे चित्ररथ*
यावर्षीच्या पथसंचनालनाचे आकर्षण विविध चित्ररथ व सादरीकरण होते. यात महिला व बालविकास विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सगरोळी, भोकरच्या शाहू महाराज विद्यालयाचे मुलींचे लेझीम पथक, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, क्षयरोग निवारण जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, क्रीडा कार्यालयाचे विविध खेळांचे प्रात्याक्षिक, विद्युत वितरण कंपनीचे अपारंपारिक ऊर्जा जनजागृती, कृषिरथ, जिल्हा माहिती कार्यालयाचा शंभर दिवस कामाचे नांदेडच्या विकासाचे, चार्ली पोलीस विभाग मोटारसायकल रायडर या चित्ररथाचा समावेश होता.