नांदेड(प्रतिनिधी) – शिवाजीनगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, दधीची मार्ग या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदाराला तीन वर्ष काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांनादिले आहे. आपल्या अर्जात झारीतील शुक्राचार्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता ब.शी.पांढरे यांचा उल्लेख केला आहे.
प्रा.राजू सोनसळे यांनी दिलेल्या अर्जानुसार शिवाजीनगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर या रस्त्याला महर्षी दधीची मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या रस्त्यावर डॉक्टर लाईन आहे. म्हणून या रस्त्यावरून जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारीका आणि या परिसरातील नागरीक यांचा वावर असतो. म्हणजे हा रस्ता वर्दळीचा परिसर आहे. शिवाजीनगर परिसरात मोठ-मोठ्यांचा वरदहस्त असलेल्या एका कंत्राटदाराने डिसेंबर 2024 मध्ये तीन रात्रीत अर्धा किलो मिटर लांबीचा रस्ता डांबरी बनवला आहे. पण या रस्त्याची गुणवत्ता पाहण्यास सार्वजिक बांधकाम विभागातून कोणीच आले नाही. हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार झाला आहे. डांबरी रस्तयाल्या भेगा पडल्या आहेत. रस्ता हाताने उखडून दाखवता येईल अशी परिस्थिती आहे. म्हणजेच रस्ता तयार करण्याच्या अंदाज पत्रकानुसार रस्त्याचे काम झालेले नाही. शासनाचे नियम आणि अटी यांचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे संबंधीत कंत्राटदारावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. एकंदरीत हे काम करतांना कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकामविभागाचे अधिकारी यांचा हेतु प्रामाणिक नाही. म्हणून मुख्य अभियंता पांढरे यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि कंत्राटदाराला तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी केली आहे.