नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावाच्या एका युवकाने उत्तर प्रदेश येथील मेरठच्या महिलेला 50 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी देगलूर आणि उत्तर प्रदेश पोलीसांनी संयुक्त मोहिम राबवून त्या युवकाला पकडले आणि त्याला उत्तर प्रदेशमध्ये घेवून गेले आहेत.
उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील सिव्हील लाईन या पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2025 दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेची कलमे 319(2), 318(4), 308(2), 75, 78, 204, 333 आणि 67 जोडलेली आहेत. या गुन्ह्याच्या हकीकतीप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील तमलूर गावाचा युवक हिमांशु उर्फ हिमालय मारोती देवकत्ते (27) याने आपण स्वत: एक मोठे व्यवसायीक असून माझे दारु उत्पादनाचे मोठ-मोठे कारखाने आहेत असे सांगून मेरठच्या एका महिलेला फसवले. मी तुझ्या सोबत लग्न करतो. तिला आणि तिच्या कुटूंबियांना फोनवर संपर्क साधला. महिलेच्या कुटूंबियांनी नकार दिल्यानंतर तो हिमांशु देवकत्ते तिचा पाठलाग करून मेरठला गेला. तो पर्यंत महिलेला कळले होते की, हिमांशु उर्फ हिमालय देवकत्ते हा बोगस माणुस आहे. तेंव्हा हिमांशुने त्या महिलेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून तिची बदनामी केली आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागून तिला धमक्या दिल्या. तु माझी पत्नी बनून महाराष्ट्रात आली नाहीस तर तुझे जिवन संपवतो अशा ही धमक्या दिल्या.
त्यानुसार मेरठ येथील सिव्हील लाईनचे पोलीस निरिक्षक महाविरसिंह हे आपल्या पथकासह नांदेडला आले. देगलूर येथील पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांना भेटले. त्यांच्या मार्गदर्शनात देगलूरचे पोलीस निरिक्षक मारोती मुंडे, पोलीस अंमलदार मोहन कनकवळे, साहेबराव सगरोळीकर, वैजनाथ होटरगे, सुधाकर मलदौडे, राजवंतसिंघ बुंगई आणि नामदेव शिराळे यांनी तमलूरच्या हिमांशु उर्फ हिमालय मारोती देवकत्ते(27) यास मेरठ, उत्तरप्रदेश पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. हिमांशुला घेवून उत्तर प्रदेश पोलीस मेरठला रवाना झाली आहे.