मासे पकडायला जाऊन एकाचा मृत्यू,एक बेपत्ता

मुखेड- येथील तरुण अजित विश्वांभर सोनकांबळे (वय २३) व गडग्याळवाडी येथील संतोष हणमंतराव मामिलवाड (वय २०) हे दोघे १८ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता
गडग्याळवाडी येथील तलावात जाळे घेवुन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघेही कपडे, चप्पल व मोबाईल काढून तळ्याच्या पाळुवर ठेवून पाण्यात उतरले. मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यातच संतोष मामिलवाड याचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा बेपत्ता झाल्याचे समजते. या घटनेची माहिती संतोष मामीलवाड यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तलाव गाठून पोलिसांना कळविले. तहसीलदार राजेश जाधव, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलिस कर्मचारी व्यंकट जाधव, तलाठी रुपेश हासुळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले या टीमच्या माध्यमातून त्या दोन तरुणांचा सकाळी ९ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. या शोध मोहीमेत गडग्याळवाडी येथील रहिवाशी असलेला युवक संतोष हणमंतराव मामीलवाड याचा मृतदेह पायात मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृतदेह शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आणण्यात आला मात्र त्याच्या सोबतचा दुसरा तरूण अजित सोनकांबळे याचा अद्याप पत्ता लागला नाही. रात्री ही शोधमोहीम थांबविण्यात आली असून उद्या दि.२० रोजी पुन्हा सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
बेपत्ता असलेला अजित सोनकांबळे हा नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विश्वांभर  सोनकांबळे कामजळगेकर यांचा मुलगा होय. दरम्यान याचा शोध घेण्यासाठी नगर पालिकेच्या जीवरक्षक दलाचे माधव आडगुलवाड, नागनाथ निमलवाड, गजानन आडगुलवाड, सचिन पंदिलवाड, विठ्ठल पंदिलवाड, संजय आडगुलवाड, संदिप आडगुलवाड, देविदास गड्डमवाड व काशीनाथ डुबुकवाड यांनी आज दिवसभर शोध घेतला मात्र तो सापडला नसल्याचे समजते. रात्री उशिरा संतोष मामिलवाड याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!