समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड : -लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 17 रोजी सायं. आयोजित करण्यात आला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, सायबर क्राईम, आदिवासी, बंजारा नृत्य असे विविध नाट्य, नाट्यस्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेतील सर्व विजेत्या शाळांना समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांची प्रमुख उपस्थितीत भारत सांस्कृतिक संघ राष्ट्रीय कार्य सदस्य डॉ. सान्वी जेठवानी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील शासकीय अनु.जाती निवासी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत घेण्यात आलेल्या मुलीच्या गटात कळमनुरी शासकीय निवासी शाळेला बंजारा नृत्य या लोकनाट्य नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक शिक्षणाचे महत्त्व नृत्य या विषयावर शासकीय निवासी शाळा हदगाव यांना दुसरा क्रमांक मिळाला.

तर मुलाच्या गटात धाराशीव जिल्ह्यातील घोडेगाव येथील शासकीय निवासी शाळेने मुला-मुलीचे एक समान नृत्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. औसा तालुक्यातील लांबचाना शासकीय निवासी शाळेचा झाडे लावा या लोकनृत्य दुसरा क्रमांक आला. लातूर जिल्ह्यातील बावची रेणापूर येथील शासकीय निवासी शाळेने अभिनय स्पर्धेत व्यसनमुक्ती अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. याच अभिनय स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शासकीय निवासी शाळेला इंटरनेटच्या सुरक्षिततेचा वापर या अभिनयास प्रथम क्रमांक मिळाला. सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!