नांदेड(प्रतिनिधी)-माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर शेवाळे यांचा खून करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात स्वत: हजर झालेल्या आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कासारखेडा येथील डॉ.अविनाश व्यंकटराव शिंदे (45) आणि त्यांचे मित्र पिंपरखेड ता.हदगाव येथील सखाराम नारायण कुंभकरण (22) हे दोघे हजर झाले आणि त्यांनी सांगितले की, आम्ही पुयणी शिवरोडवरील देशमुख कॉलनी येथे दिनकर शेवाळेचा खून केला आहे. यानंतर घटनेची जागा पोलीस स्टेशन लिंबगावच्या हद्दीत असल्याने यासंदर्भाचा जबाब लिंबगावच्या तत्कालीन पोलीस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घेतला. त्यात दिनकर शेवाळेच्या पत्नी सिंधू दिनकर शेवाळे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दिनकर शेवाळे यांनी डॉ.अविनाश शिंदेकडून 40 लाख रुपये उसने घेतले होते. ती रक्कम कारखाना टाकायचा होता. म्हणून घेतली होती. ती रक्कम व्याजासकट परत केली. पण त्यानंतर सुध्दा डॉ.अविनाश शिंदे आणि त्यांचे काही सहकारी आमच्या घरी येवून व्याजाचे 50 लाख रुपये झाले आहेत. ते मला दे असे म्हणून नेहमी धमक्या देत असे.
घटनेच्या अर्थात 26 डिसेंबर 2017 च्या दोन महिन्यापुर्वी मी व माझी मुले घरी असतांना डॉ.अविनाश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनकर शेवाळेला आपल्या कारमध्ये टाकून कासारखेडा येथे घेवून गेले होते आणि दोन तासांनी घरी आणून सोडले होते. त्यावेळी सुध्दा त्यांना पैशासाठी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दिनकर शेवाळेने एक भुखंड विक्री खताच्या आधारावर तेजेंद्रसिंघ यांच्या नावे करून दिला होता. पुयणी शिवरोडवर आमच्या घराचे बांधकाम सुरू आहे. 25 डिसेंबर 2017 रोजी माझे पती दिनकर शेवाळे तेथेच झोपायला गेले होते. 26 डिसेंबर रोजी सकाळी त्या घरातून पळत असतांना डॉ.अविनाश शिंदे आणि सखाराम कुंभकरण यांना पळतांना पाहणारी महिला साक्षीदार उपलब्ध आहे. तरी माझा नवरा दिनकर शेवाळेला डॉ.अविनाश शिंदे आणि सखाराम कुंभकरण या दोघांनी धारधार शस्त्राने दिनकर शेवाळे झोपेत असतांना त्यांच्या डोक्यावर, पोटावर, पाठीवर, मानेवर अशा विविध ठिकाणी हल्ला करून त्यांचा खून केला आहे. हल्लेखोर एका कारमध्ये आणि दुचाकीवर आले होते.
या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीसांनी डॉ.अविनाश शिंदे आणि सखाराम कुंभकरण विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(2)(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 93/2017 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सध्या हिंगोली येथे अपर पोलीस अधिक्षक असलेल्या अर्चना पाटील यांच्याकडे देण्यात आला. अर्चना पाटील यांनी दोन्ही आरोपींना अटक करून सखोल तपास करून डॉ.अविनाश शिंदे आणि सखाराम कुंभकरण विरुध्द नांदेड जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हा सत्र खटला ऍट्रॉसिटी स्पेशल केस क्रमंाक 7/2018 नुसार सुरू झाला. या खटल्यात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध झालेल्या पुराव्याला अत्यंत उत्कृष्टपणे छाननी करत अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज डॉ.अविनाश व्यंकटराव शिंदे आणि सखाराम नारायण कुंभकरण या दोघांना भारतीय दंड संहितेचरूत्त कलम 302, 34 नुसार आजन्म कारावास आणि प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. कलम 452, 34 नुसार या दोघांना तिन वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा आरोपींना एकत्रित भोगायच्या आहेत. दंडाची 30 हजार रुपये रक्कम जमा झाल्यानंतर, अपील मुदत संपल्यानंतर ती 30 हजार रुपये रक्कम फिर्यादी सिंधू दिनकर शेवाळे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडली. डॉ.अविनाश शिंदेच्यावतीने ऍड.डी.के.हांडे यांनी काम पाहिले तर सखाराम कुंभकरणच्यावतीने ऍड.नितिन कागणे यांनी काम केले. या खटल्यात लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार एस.एन.सुब्बनवाड यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.